(बीजिंग)
आपले वय वेगाने वाढू नये, आपण लवकर वृद्ध होऊ नये, तसेच कायम तरुण, सुंदर आणि चपळच राहावे अशी जगातील बहुतांश स्त्री-पुरुषांची इच्छा असते. जगातील बहुतांश लोकांना त्यांच्या वाढत्या वयाची चिंता असते कारण त्यांना लवकर वृद्ध व्हायचे नसते. या पृष्ठभूमीवर ‘आपण असा एक शोध लावला आहे की ज्यामुळे आता माणूस कधीच वृद्ध होणार नाही व मानवांचे वृद्धत्व थांबू शकते’, असा दावा एका चिनी शास्त्रज्ञाने केला आहे. जियानकुई असे या चिनी शास्त्रज्ञाचे नाव आहे. आपण २०१८ मध्ये पहिले ‘जीन-एडिटेड’ मूल निर्माण केले होते, असा खुलासा त्याने केला आहे. अवैध चिकित्सा पद्धत अवलंबल्यामुळे जियानकुईला तीन वर्षांचा तुरुंगवासही भोगावा लागला आहे.
जियानकुई यांनी बीजिंगमध्ये संशोधन प्रयोगशाळा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ते जीन थेरपीद्वारे दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहेत. त्यांच्या या नव्या संशोधन प्रस्तावावरून वाद सुरू झाला आहे. हे देखील जियानकुईच्या आधीच्या अवैध कामांसारखेच असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच जियानकुईच्या नव्या संशोधनावर टीका होत आहे. त्यांचे नवे संशोधन कार्य अनैतिक आणि धोकादायक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. गर्भधारणेसाठी कोणत्याही मानवी भूषणांचे रोपण केले जाणार नाही, असे जियानकुई यांनी सरकारला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. तसेच प्रयोगापूर्वी आपण सरकारची परवानगी घेऊ कारण आपल्याला पुन्हा तुरुंगात जायचे नाही, असेही त्यांनी म्हटले.
वृद्धत्व रोखण्यासंदर्भातील ‘जीन म्युटेशन’ अर्थात जीन उत्परिवर्तनाचे जियानकुईंचे प्रयोग वादात सापडले आहेत. तज्ज्ञांनी त्यांच्या या प्रस्तावाला वैज्ञानिकदृष्ट्या निराधार म्हटले आहे. चीन सरकारने जनुक संपादन आणि त्याच्याशी निगडित नैतिक पैलूंचे नियमन करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असेही या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. सिंगापूरमधील नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे सहयोगी प्राध्यापक पीटर ड्रोगे यांनी या संपूर्ण प्रयोगाचे वर्णन ‘वेडेपणा’ या एका शब्दात केले आहे.