(मुंबई)
उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ आज २३ जानेवारीपासून संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची जबाबदारी काय असणार, त्यांचे पक्षात काय स्थान असणार, यावर चर्चा सुरु झाली आहे. पक्षाच्या घटनेनुसार उद्धवजी ठाकरे आता एक सामान्य शिवसैनिक बनले आहेत. त्यांच्याकडील पक्षप्रमुख पदाचे अधिकार राहिले नसल्याने आजपासून पक्षात कुणी बंडखोरी किंवा पक्ष शिस्तीचा भंग केला, तरी संबंधित पदाधिकाऱ्याची उद्धव ठाकरे हकालपट्टी करू शकणार नाहीत, असे सांगितले जात आहे.
सध्या शिवसेना पक्ष कुणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. यावरील सुनावणी आयोगाने ३० जानेवारीपर्यंत स्थगित केली आहे. तोवर दोन्ही बाजूच्या वकिलांना त्यांचे-त्यांचे म्हणणे लेखी कळवण्याचा आदेश आयोगाने दिला आहे. मात्र त्या दरम्यान उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपुष्टात आला आहे. २३ जानेवारी २०१८ रोजी उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षप्रमुखपदी निवड झाली होती. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पक्षप्रमुख पदासाठी निवडणूक घेण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती, मात्र आयोगाने त्यावर प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षांतर्गत असलेल्या कोणत्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त रहावे लागणार यावर आता चर्चा सुरु झाली आहे.
आता उद्धव ठाकरे उपरोक्त कोणत्याही अधिकाराचा वापर करू शकणार नाहीत. तसेच उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना जबाबदारी वाटू शकणार नाहीत, अथवा कुणाची निवड करू शकणार नाहीत वा सध्या कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराची यादी निश्चित करू शकणार नाहीत. तर अशी परिस्थिती किती दिवस राहणार हे आता निवडणूक आयोगाच्या हाती राहणार आहे.