(मुंबई)
आपण लवकरच सत्तेत असू आणि आपली कामे आता ५० टक्के नाही तर १०० टक्के पूर्ण होतील, असे सूचक विधान महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कामगार मेळावा सोमवारी मुंबईत पार पडला. त्यावेळी बोलत असताना अमित ठाकरेंनी हा विश्वास व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणात हे सर्व प्रश्न लवकरच दूर होईल आणि आपण सत्तेत असू असे म्हटले होते. त्यानंतर आता अमित ठाकरेंनीही असेच मोठे विधान केल्याने आता चर्चा रंगल्या आहेत.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आज मी येथे कामगार सेनेची ताकद बघायला आलो आहे. तुम्ही उगाच माझे नाव घेता. जे काही आहे ते सगळे तुमचे सगळ्यांचे कष्ट आहेत. तुम्ही म्हणता की ५० टक्के कामे होतात ५० टक्के कामे होत नाहीत. पण खात्री बाळगा आपण लवकरच सत्तेत असू, आपली १०० टक्के कामे पूर्ण होतील असा मला पूर्ण विश्वास आहे, असा दावा अमित ठाकरेंनी केला.
कामगार मेळाव्याला शर्मिला ठाकरे यांनीही हजेरी लावली होती. त्या म्हणाल्या, अमित राजकारणात आल्यापासून मी आळशी झाली आहे. इथे येणार नव्हते पण फक्त तुमच्यासाठी आले. कामगार कपात सगळीकडे सुरु आहे. त्यात आपण कामगारांना न्याय देत आहात. तुमच्या कामाचा कौतुक करण्यासाठी आले आहे. पुढच्या वर्षी येणार नाही कारण पुढच्या वर्षी माईक हा अमितच्या हातात गेला पाहिजे. बाकीच्यांची टीम ६० प्लस आहे. आपली टीम तरुण आहे. कठीण काळात तुम्ही कामगारांना न्याय मिळवून देत आहात. सगळ्यांनी चांगले काम केले आहे, म्हणून एवढे युनिट वाढले आहेत. आपले काम खूप चांगले सुरू आहे. कठीण काळात कामगारांना न्याय मिळवून दिला जातो आहे. कामगारांच्या हिताची कामे होत आहेत त्यामुळे हे संघटन वाढले आहे.
सध्याच्या राजकारणात कुस्त्या सुरू आहेत. उद्धव ठाकरेंची कुस्ती एकनाथ शिंदेंसोबत सुरू आहेत. तर फडणवीसांसोबतही ही कुस्ती सुरू आहे. तर संजय राऊत विरूद्ध नितेश राणे अशी कुस्ती सुरु आहे. अजित पवार यांची घरातच कुस्ती सुरू आहे. बारसूमध्येही राजकीय कुस्ती सुरू आहे. कोण कोणाला पाठिंबा देत आहे आणि कोण कुणाच्या विरोधात आहे हेच कळत नाही. राज ठाकरेंचीही या कुस्तीत एंट्री होईल, असे म्हणत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सूचक विधान केले.