(नवी दिल्ली)
पुढील वर्षी आणखी विमानतळांवर डिजी प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. सध्या देशांतर्गत प्रवाशांसाठी १३ विमानतळांवर ही सुविधा उपलब्ध आहे, असे नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले. डिजी प्रवास फेशियल रिकग्निशन टेक्नॉलॉजीद्वारे (एफआरटी) विमानतळावरील विविध चेक पॉईंट्सवर प्रवाशांची संपर्करहित आणि अखंड हालचाल सुनिश्चित करतो.
ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, पहिल्या टप्प्यात १४ विमानतळांवर आणि पुढच्या वर्षी दुसऱ्या टप्प्यात ११ विमानतळांवर डिजी प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. २०२४ च्या अखेरीस आणखी २५ विमानतळांवर ही सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे डिजी प्रवास सुविधा असलेल्या विमानतळांची एकूण संख्या ३८ होणार आहे. सध्या देशातील ८५ टक्के देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतूक हाताळणाऱ्या १३ विमानतळांवर डिजी प्रवास सुविधा उपलब्ध आहे.
डिजी प्रवासासाठी प्रवाशाने शेअर केलेला डेटा एन्क्रिप्टेड फॉरमॅटमध्ये साठवला जातो. सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशाला आधार-आधारित प्रमाणीकरण आणि स्वत:ची प्रतिमा वापरून डिजी प्रवास अॅपवर त्याचे तपशील नोंदवावे लागतील. पुढील चरणात बोर्डिंग पास स्कॅन करावा लागेल आणि क्रेडेन्शियल्स विमानतळासह सामायिक केले जातील.