(नवी दिल्ली)
जागतिक स्तरावरील भूक आणि कुपोषणाच्या बाबतीत भारत १२१ देशांपैकी १०७ व्या क्रमांकावर आला. यावरूनच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी थेट भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढविला. देशातील उपासमारीचा टाहो केंद्र सरकारच्या कानी पडत नाही. सरकार आणखी किती दिवस देशाची अशी फसवणूक करणार आहे, असे शरसंधान राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलरवरून साधले.
देशाला कुपोषित करण्याचे काम संघ आणि भाजपा करीत आहे. उपासमारीच्या बाबतीत भाजप वस्तुस्थिती लपवित आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. तर या अहवालावरून विरोधकांच्या टिकेचे लक्ष्य झालेल्या केंद्र सरकारने चक्क हा अहवालच फेटाळून लावला.
जागतिक स्तरावर केलेली ही पाहणीच मुळात जमिनीवरील वास्तवाचा विपर्यास्त करणारा आहे. कोरोना महामारीच्या काळात सरकारने केलेल्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले आहे. भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न यातून झाल्याचा उलटा आरोप केंद्राने केला आहे.