(संगमेश्वर / प्रतिनिधी)
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाच्या ५६ व्या युवा महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत १५ बक्षिसे मिळवून चमकदार कामगिरी केली आहे. ह्या सर्वच्या सर्व सांघिक व वैयक्तिक कलाप्रकारांनी मुंबई विद्यापीठाच्या अंतिम स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे. महाविद्यालयाने फाईन आर्टमधील सर्वच्या सर्व म्हणजे ७ कला प्रकारात यशस्वी कामगिरी करून यशाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाची विद्यार्थिनी संस्कृती ब्रीद हिने गायन प्रकारात ३ बक्षीसे प्राप्त करून आपल्या कलेची चुणूक दाखवली.
महाविद्यालयातील सहभागी व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शकांच्या सत्काराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, सांस्कृतिक समन्वयक प्रा. विकास शृंगारे, प्रा. डॉ. वर्षा फाटक, प्रा. नेहलता पुजारी, प्रा. धनंजय दळवी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. विकास शृंगारे यांनी स्पर्धेची पूर्व तयारी, विद्यार्थी व मार्गदर्शकांनी स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत याबाबतचा सखोल आढावा घेतला.
उपप्राचार्य डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांशी हितगुज साधली. प्रा. धनंजय दळवी यांनी महाविद्यालयाला यापूर्वीच्या युवा महोत्सवात मिळालेले यश व या स्पर्धेतील यश याबाबतचा लेखाजोखा, फाईन आर्ट कला प्रकारातील यशाच्या इतिहासाचा मागोवा, याचबरोबर अंतिम स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना करावी लागणारी तयारी यावर भाष्य केले.
सत्कार करण्यात आलेले विद्यार्थी, मार्गदर्शक व त्यांचे कलाप्रकार पुढील प्रमाणे- १. संस्कृती ब्रीद- भावगीत गायन (द्वितीय), शास्त्रीय गायन (तृतीय), नाट्यसंगीत (तृतीय).२. सुयोग रहाटे- मातीकाम (प्रथम), कोलाज (द्वितीय), कार्टूनिंग (द्वितीय). ३. अक्षय वहाळकर- रांगोळी (प्रथम), ऑन द स्पॉट पेंटिंग (द्वितीय), पोस्टर मेकिंग (उत्तेजनार्थ). ४. सिद्धी शिंदे आणि श्रावणी राजवाडे मेहंदी डिजाइन (प्रथम).५. साक्षी सावंत- मोनो अॅक्टींग- मराठी (प्रथम). ६. तनया चव्हाण- कथाकथन- हिंदी (प्रथम). ७. साहिल खेडस्कर- मोनो अॅक्टींग- हिंदी (द्वितीय). ८.स्किट- मराठी- द्वितीय- ओमकार गुरव, प्रथम शिंदे, साक्षी सावंत, श्रेया वैद्य, श्रावणी अवसरे व वैष्णवी भोसले. ९. भारतीय लोकनृत्य- द्वितीय- साक्षी कांबळे, प्रीती पाष्टे, नम्रता नलावडे, सायली मोरे, साक्षी बडवे, आकांक्षा ननावरे, साक्षी गवंडी व वैष्णवी भोसले. मार्गदर्शक- फाईन आर्ट- कलाशिक्षक सुरज मोहिते, विलास रहाटे. गायन- राधा भट. नृत्य- प्रथमेश पिंपळकर, श्रेया ढेरे. नाट्य- दीपेश घाणेकर, सागर माने.
या कार्यक्रमात नाट्य दिग्दर्शक दीपेश घाणेकर यांनी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी आणि स्पर्धेतील नाट्य सादरीकरण या दरम्यान घडलेले विविध प्रसंग कथन केले, तसेच महाविद्यालयाने संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. विद्यार्थी प्रथम शिंदे आणि सुयोग रहाटे यांनी आपले शिक्षक व मार्गदर्शक यांची कामातील आस्था व विद्यार्थ्यांप्रती असणारी तळमळ आणि सहकार्य याबाबत कृतज्ञता व्यक्त केली, तसेच महाविद्यालयातील कर्मचारी व प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांच्याप्रति आभार व्यक्त केले.
प्राचार्य डॉ.नरेंद्र तेंडोलकर यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करतानाच, आपल्या यशात सातत्य राखायला हवे असल्यास कायमस्वरूपी कोणत्याही कलेचा सराव करण्याची गरज व्यक्त केली. विविध प्रकारच्या कलांसाठी महाविद्यालय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच यासाठी आवश्यक तज्ञ मार्गदर्शकांचे प्रशिक्षण व सराव आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्व आणि कला विकसित करण्यासाठी सातत्याने वाचन, आकलन, मनन व चिंतन आवश्यक असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिवाकर पाटणकर आणि आभार प्रा. शुभम पेठकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता सुरुचीपूर्ण अल्पोपहाराने करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या स्पर्धेतील मार्गदर्शनासाठी तसेच कार्यालयीन व तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी प्रा. पुनम भोपळकर, प्रा. प्रज्ञा शिंदे, प्रा. ललिता तांबे, प्रा. गायत्री जोशी, प्रा. प्रथमेश लिंगायत, प्रा. नीलम आखाडे, प्रा. वृणाली रेवणे, प्रा. स्वप्ना पुरोहित, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, सहाय्यक स्वप्निल कांगणे, कार्यालयातील मीता भागवत व अमित कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शकांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.