(संगमेश्वर)
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात प्रा. श्री. अनंत विनायक पाध्ये यांच्या शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य विषयाचे अध्यापक श्री. अनंत पाध्ये ३२ वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्याने या शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. सीमा शेट्ये यांनी केले.
प्रा. अनंत पाध्ये व सौ. शालिनी पाध्ये यांना देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने कनिष्ठ महाविद्यालयाच्या चेअरमन ॲड. वेदा प्रभूदेसाई, कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, कार्यालयाच्यावतीने अमित कुलकर्णी, वरिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने प्रा. सागर संकपाळ व प्रा.स्नेहलता पुजारी यांनी सन्मानित केले. यानंतर सहकारी प्रा. संदीप मुळ्ये, प्रा. सुवर्णा साळवी, प्रा. स्नेहलता पुजारी, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी प्रा. पाध्ये यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना महाविद्यालयातील विविध विभागात त्यांनी केलेले कार्य, त्यांची अध्यापनातील विविध महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये, महाविद्यालयाच्या जडणघडणीतील त्यांचे योगदान व सहकार्य याचा आढावा घेतला.
प्रा. अनंत पाध्ये यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ आणि महाविद्यालय यांच्याकडून सेवा करताना मिळालेले सहकार्य व प्रोत्साहन, तसेच प्रगती व विकासासाठी लाभलेल्या संधी याबाबत सविस्तर विवेचन केले. यानंतर देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने ॲड. वेदा प्रभुदेसाई, संस्था उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी प्रा. पाध्ये यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण जोशी यांनी केले.