(संगमेश्वर)
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाने नुकत्याच मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ५६व्या युवा महोत्सवाच्या अंतिम स्पर्धेत २ सुवर्ण पदके प्राप्त करून महाविद्यालयाच्या सन्मानात भर घातली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या या स्पर्धेत फाईन आर्टमधील ‘कोलाज’ या कला प्रकारात सुयोग चंद्रकांत रहाटे याने सुवर्णपदकला गवसणी घातली, तर विद्यार्थिनींनी ‘सामूहिक लोकनृत्य’ प्रकारात सुवर्णपदक प्राप्त करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे.
सुयोग रहाटे याने कोलाज कला सादर करताना स्थिरचित्र साकारून सुवर्णपदक प्राप्त केले. तर महाविद्यालयातील मुलींच्या संघाने त्रिपुरा राज्यातील रेआंग जमातीचे होजागिरी हे लोकनृत्य सादर करून सुवर्णपदक आपलेसे केले. या लोकनृत्यात आठ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये आकांक्षा ननावरे, प्रीती पाष्टे, नम्रता नलावडे, सायली मोरे, साक्षी बडबे, साक्षी कांबळे, साक्षी गवंडी आणि वैष्णवी भोसले यांचा समावेश होता. या लोकनृत्याचे दिग्दर्शन प्रथमेश पिंपळकर, श्रेया ढेरे व दीपेश घाणेकर यांनी केले होते.
५६व्या मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात महाविद्यालयाला यावर्षी एकूण ५ सुवर्ण व २ रौप्य पदके प्राप्त झाली. फाईन आर्ट कलाप्रकारात ४ सुवर्ण पदके व २ रौप्य पदके प्राप्त करून महाविद्यालयाने आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना फाईन आर्ट कला प्रकारांसाठी कलाशिक्षक सुरज मोहिते आणि विलास रहाटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विकास शृंगारे आणि प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.