(मुंबई)
आमदार अपात्र ठरतील, सरकार पडेल, नवे सरकार येईल या गोष्टी राजकारणात घडत असतात. पण आज सर्वोच्च न्यायालयात देशाच्या भविष्याचा फैसला होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. निकाल आमच्या बाजूने लागेल असे म्हणत नाही, पण संविधानाचा, कायद्याचा विजय व्हावा. या देशात कायदा, संविधान उरले असेल, न्याययंत्रणेवर कुणाचाही दबाव नसेल तर नक्की न्याय होईल, असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी संजय राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले की, या देशात लोकशाही आहे की नाही? हा देश विधानसभा आणि संसदेनुसार काम करतेय की नाही? न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की कुणाच्या दबावाखाली काम करतेय ? याचा फैसला आज होईल.