भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (शनिवार १४ ऑक्टोबर) एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील १२वा सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 11 वा सामना खेळण्यास तयार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादमध्ये होणार आहे. टीम इंडियासमोर पाकिस्तानचं कडवं आव्हान असणार आहे. कारण टीम इंडियाप्रमाणे पाकिस्तान टीमनेही सलग 2 सामने जिंकले आहेत.
विश्वचषक सामन्यात या अगोदर भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव करून आज पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. पहिल्या दोन विजयामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. दुसरीकडे पाकिस्तान संघानेही विश्वचषकात पहिले दोन सामने जिंकून शानदार सुरुवात केली. पाकिस्तानने नेदरलँड आणि श्रीलंका यांच्याविरोधात विजय मिळवला. श्रीलंकाविरोधात पाकिस्तान संघाने ३४४ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करीत इतिहास रचला. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वांत मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग ठरला. त्यामुळे पाकिस्तान संघाचा आत्मविश्वासही वाढला आहे.
भारतीय संघाच्या वेगवान मा-यासोबतच फिरकी गोलंदाजही भन्नाट फॉर्ममध्ये आहेत. कुलदीप यादवची फिरकी आणि बुमराहच्या वेगवान गोलंदाजांपुढे टिकून राहणे पाकिस्तानी फलंदाजासाठी सोपे नसेल. त्याचबरोबर गेल्या काही सामन्यांमध्ये भारताची फलंदाजीही शानदार राहिली आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला पराभूत करणे पाकिस्तानसाठी खूप कठीण जाणार आहे. मात्र, या निमित्ताने आज चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
सध्याच्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघांचा फॉर्म चांगला आहे. भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवला आहे. त्याचवेळी पाकिस्तानने नेदरलँड आणि श्रीलंकेचा पराभव केला होता. आता रोहित शर्मा आणि बाबर आझम यांच्या नजरा विजयाची हॅट्ट्रिक करण्यावर असतील.
अनेक दिवसांपासून चाहते या सामन्याची वाट पाहत होते. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहू शकतात. प्रत्येकाला रोमांचक सामना पाहायचा आहे, परंतु पावसाने आशा धुळीस मिळवू शकतो. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) अहमदाबाद शहर आणि उत्तर गुजरातमध्ये सामन्यादरम्यान हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
याआधीच टीम इंडियाचे वर्ल्ड कपआधीचे 2 सराव सामने हे पावसामुळे रद्द झालेत. तसेच त्याआधी टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2023 मधील सामनाही पावसामुळे राखीव दिवशी पार पडला आणि निकाली निघाला. त्यामुळे वर्ल्ड कपमधील या हायव्होल्टेज सामन्यात पावसाने एन्ट्री घेतली आणि मॅच रद्द करण्याचा निर्णय झाल्यास विजेता कोण, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना आहे.
पावसामुळे सामना रद्द झाल्यास भारत आणि पाकिस्तानला प्रत्येकी एक गुण मिळेल. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नाही. स्पर्धेतील बाद फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस आहेत. अशी परिस्थिती उद्भवू नये आणि त्यांना संपूर्ण सामना पाहायला मिळावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे. क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा थरार हवा आहे. त्यामुळे सामन्यात पाऊस होऊ नये, अशीच भारतीयांची इच्छा आहे.