(रत्नागिरी)
गोविंदा रे गोपाळा, अशा गाण्यावर थिरकत मोठ्या जल्लोषात साजरा होणाऱ्या दहीहंडीसाठी गोविंदा पथकं सज्ज झाली आहेत.गोपाळकाल्याच्या दिवशी गुरुवारी (ता. ७) जिल्ह्यात ३०९ सार्वजनिक, तर ३ हजार ४३ खासगी दहीहंड्या बांधल्या जाणार आहेत. त्या फोडण्यासाठी येणाऱ्या गोविंदा पथकांना बक्षिसांची लयलूट करायला मिळणार आहे. प्रतिष्ठेसाठी राजकीय पक्षांच्या लाखो रुपयांच्या हंड्या ठिकठिकाणी बांधण्यात आल्या आहेत. रत्नागिरीमध्ये राजकीय हंड्या उभारण्याची जागा यंदा बदलली असून मांडवीऐवजी भाट्ये किनारी त्या बांधल्या जाणार आहेत.
गतवर्षीपेक्षा यावर्षी दहिहंड्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. थरांवर थर लावण्याचा सराव गेले काही दिवस ग्रामीण भागात सुरू आहे. जिल्ह्यात शहर परिसरात ७ ते ८ थर असणाऱ्या हंड्या बांधल्या जातात. यंदा राजकीय कल्लोळ सुरू असल्यामुळे शहर परिसरात विविध ठिकाणी राजकीय पक्षांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. रत्नागिरी शहरातील मांडवी किनारी होणाऱ्या दहिहंडीचा उत्सव संरक्षक बंधाऱ्यामुळे या वर्षी तो भाट्ये समुद्रकिनारी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून तसे जाहीर करण्यात आले आहे.