(मुंबई)
गरजू, बेघर, भूमिहीन लाभार्थ्यांचे घरकुलांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. राज्य शासन आज मुंबई येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून 5 लाख गरीब, गरजू लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देणार आहे.
राज्यात 20 नोव्हेंबर 2022 रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनापासून ते 31 मार्च 2023 या कालावधीत ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ व महाआवास अभियान पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. हा कार्यक्रम मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर ऑडिटोरिअम येथे आज गुरूवारी 24 रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे.
‘सर्वांसाठी घरे-2024’ या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे व कामात गुणवत्ता आणणे हा या अभियानाचा हेतू आहे.
या अभियानाचा उद्देश
▪️ भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे
▪️ घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजूरी देणे
▪️ मंजूर घरकुलांना सर्व हप्ते वेळेत वितरीत करणे.
▪️ सर्व मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे
▪️ प्रलंबित घरकुले पूर्ण करणे
▪️ ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे.
▪️ इंदिरा आवास योजनेंतर्गत उर्वरित सर्व घरकुले पूर्ण करणे व क्षेत्र अधिकारी ॲप वापरणे.
▪️ सामाजिक लेखापरीक्षण वेळेत करणे.
▪️ शासकीय योजनांशी कृतीसंगम करणे
▪️ नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे, असे 10 उपक्रम राबविण्यात येत आहे.