(खेड)
दापोली तालुक्यातील आंजर्ले- म्हैसोंडे खाडीत कित्येक दिवसांपासून सक्शन पंपाने वाळू उपसा सुरू असून याबाबत महसूल विभागाला माहिती असूनही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वाळू उपशाबाबत महसूल विभागाची बोटचेपी भूमिका का, असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
हा वाळू उपसा वाहतूक करण्यासाठी खाडीतील कांदळवन तोडून रस्ता तयार करण्यात आला असून भरदिवसा खाडीत सक्शन पंप चालविले जात आहेत. मॅनग्रुव्हंस फाउंडेशनसारख्या संघटना कांदळवन बचावासाठी झटत असताना वाळू माफिया मात्र आपल्या निजी फायद्यासाठी कांदळवनाची कत्तल करत आहेत.
म्हैसोंडे खाडीत रोज शेकडो ब्रास वाळू उपसा केला जात असून राजरोस वाळू सुरू असलेल्या या वाळू उपशाकडे मात्र दापोली महसूल प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे. नुकतीच दाभीळ खाडीत दापोली महसूल प्रशासनाने कारवाई केली होती. मात्र, म्हैसोंडे खाडीतील वाळू उपशाला अभय दिले जात आहे. याच खाडीतील वाळूने भरलेले डंपर दिवसा दापोली शहरातून धावत आहेत. मात्र, आज तगायत अशा डंपरवर कारवाई होताना दिसत नाही. तर वर्षभरात डंपर गाडीवर कारवाई करून दंड वसुली मोहीम दापोली महसूल विभागाकडून केली जात नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दापोली पोलीस ठाण्याच्या समोरून ही वाळूने भरलेली वाहने धावत असून, पोलिसांचे देखील दुर्लक्ष होत आहे. या खाडीत तीन ते चार ठिकाणी सक्शन पंप सुरू आहेत. या बाबत महसूल विभागाकडे तक्रारीदेखील होत आहेत. काही नागरिकांनी लेखी तक्रारीदेखील दिल्या आहेत; मात्र तरीही कारवाई होत नाही. यामुळे महसूल विभागाच्या या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. तरी दापोली तहसीलदार यांनी या बेकायदेशीर वाळू उपशाकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.