(गणपतीपुळे / वैभव पवार)
आपण सर्व विद्यार्थी मोबाईल मध्ये गुंतलेलो आहोत.कोण फेसबुकवर, कोण इंस्टाग्रामवर तर कुणी व्हॉटसॲपवर व्यस्त असतं.आजच्या काळात विद्यार्थ्यांसाठी कथाकथन, कथावाचनासारखे कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे. ते पाऊल आज कोकण मराठी साहित्य परिषद युवा शाखेने उचलले आहे. या कथा ऐकून त्यातून प्रेरणा घेऊन तुमच्या मधूनही कथालेखक, साहित्यिक घडावेत. त्यादिवशी असे उपक्रम यशस्वी होतील अशी अपेक्षा कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव राजेश गोसावी यांनी व्यक्त केली. ते आज अ.के.देसाई हायस्कूल येथे कोकण मराठी साहित्य परिषद युवाशाखा आयोजित कथाकथन कार्यक्रमात बोलत होते. पुढे राजेश गोसावी यांनी बालनाट्यात यश मिळविणाऱ्या देसाई हायस्कूलचे कौतुक केले.बालनाट्य आणि देसाई हायस्कूल हे एक समीकरण आहे.गेल्यावर्षी राज्यात पहिला क्रमांक मिळवून तुम्ही इतिहास रचलात त्याबद्दल सर्व विद्यार्थी आणि संतोष गार्डी यांचे राजेश गोसावी यांनी अभिनंदन केले.
कोकण मराठी साहित्य परिषद युवाशाखा आयोजित कथाकथन कार्यक्रमाप्रसंगी अ.के.देसाई हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद शेखर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव राजेश गोसावी,कोमसाप रत्नागिरी युवाशाखेचे अध्यक्ष आणि कथालेखक दुर्गेश आखाडे,कथालेखक ज्ञानेश्वर पाटील, कथालेखिका कमल बावडेकर, प्रा.डॉ.अस्मिता मजगावकर,अंजली पिलणकर, विनोद गावखडकर, संतोष गार्डी, मीनल नाखरेकर आणि श्री.लोहार उपस्थित होते. यावेळी कमल बावडेकर यांनी जाणीव हि कथा सांगितली. त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील यांनी पाऊल तिचं या कथेतून उमलणाऱ्या वयातील भावविश्व, मुलांची जबाबदारी आणि पालकांची कर्तव्य यावर भाषा करणारी कथा सांगितली. आजकाल मुलांच्या अपहरणाच्या घटना घडतात त्यावर आधारित अपहरण ही कथा दुर्गेश आखाडे यांनी सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक प्रमोद शेखर यांनी कथाकथनानंतर आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या.ते म्हणाले की, माझ्या आजीच्या मांडीवर मी डोकं ठेवून झोपायचो आणि आजी मला गोष्ट सांगायची.आजच्या छोट्या कुटूंबात गोष्ट सांगणार कुणी नाही आहे म्हणून कथाकथनाचे कार्यक्रम महत्वाचे आहेत. भविष्यात तुमच्यातून एक कथालेखक तयार व्हावा अशी अपेक्षा प्रमोद शेखर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाची प्रस्तावना विनोद गावखडकर आणि सूत्रसंचालन संतोष गार्डी यांनी केले.