(पाचल/वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील पाचल गाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पाचलमध्ये निवडणुकीचे वातावरण निर्माण झालं असून यावेळी लोकनियुक्त सरपंच आसल्याने, सरपंच पदासाठी अनेक नावं समोर येत आहेत. काही उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. तर काहींवर सरपंच पदासाठी उमेदवारीची जबाबदारी वरिष्ठानीच सोपवली आहे. या सर्व घडामोडीत यावेळी सरपंच नक्की कोण होईल अशी उलट सुलट जोरदार चर्चा मात्र पाचल पंचक्रोशीतील अनेक गावामध्ये सुरु आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून पाचल ग्रामपंचायतचीच्या उमेदवारांसाठी 18 डिसेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. सध्या पाचल मध्ये निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली असून पाचल गावामध्ये काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकत्र बैठक पाचल येथील उदय सक्रे यांच्या निवासस्थानी नुकतीच पार पडली. या सभेत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने स्वतंत्र पॅनल करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी सरपंच पदाची निवडणूक ही लोकनियुक्त होणार असल्याने सर्व वार्डातून सरपंच पदाला प्रत्यक्ष मतदान होणार असून, पॅनलच्या सदस्य पदाच्या उमेदवारीलाही मतदान होणार आहे.
पाचल मध्ये यावेळी सरपंच पदासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या ग्रामविकास पॅनलचे उमेदवार म्हणून किशोर शिवराम नारकर निवडणूक लढवणार असल्याचे सर्वानुमते यावेळी जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत त्यांचे असंख्य सहकारी असून या पॅनल ला सर्व स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रचारादरम्यान दिसून येतं आहे.
किशोर शिवराम नारकर यांना खात्री आहे की, जनतेचा कौल हा त्यांच्या बाजूनेच लागणार असून गेल्या दहा वर्षांमध्ये गावामध्ये विकासाला दिलेलं प्राधान्य याला महत्त्व देऊन होणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकांचा भरघोस प्रतिसाद आपल्याला मिळणार असल्याचे, तसेच आम्ही यापुढे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या ग्रामविकास पॅनलच्या वतीने गावाचा विकास आराखडा तयार केलेला असून भविष्यामध्ये शिक्षण, रोजगार, आरोग्य,यांच्यासारख्या महत्त्वाच्या मुद्यावर आमचा आराखडा असून त्याचा प्रत्यक्ष जाहीरनामा आम्ही लवकरच प्रकाशित करणार असल्याचे माहिती किशोर नारकर यांनी यावेळी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, मला खात्री आहे आमच्या पॅनलचे उमेदवार आणि मी स्वतः सरपंच पदाचा उमेदवार असून आम्हाला पाचल गावामध्ये भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने निश्चितच आम्ही यशस्वी होणार असल्याची खात्री मला आहे.