( रत्नागिरी / प्रतिनिधी )
कशाला मुलाचा अट्टाहास, मुलगी हीच वंशाचा दिवा अशी वारंवार शासनाकडून जनजागृती केली जाते. मात्र तरीही लोकामध्ये मुलगा हाच वंशाचा दिवा मानून त्याला प्रथम प्राधान्य दिले जात आहे. मुलीला मात्र दूजाभाव दिला जात आहे. अशीच एक घटना जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे घडली आहे. जुळ्या जन्मलेल्या मुलगा आणि मुलींपैकी जेव्हा निवडण्याची वेळ आली तेव्हा आई-वडिलांनी मुलालाच निवडले. यावेळी मुली प्रती असलेला दूजाभाव पुन्हा दिसून आला. मात्र या मुलीला आई-वडिलांनी जरी नाकारले असले तरी अधिकाऱ्यांनी मात्र तारले आहे. जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, सीईओ इंदुरानी जाखड आणि प्रशांत पटवर्धन यांनी मुलीला नवसंजीवनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, सिव्हील हॉस्पिटल मध्ये एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. एक मुलगा आणि एक मुलगी अशी जन्माला आलेली मुलं होती. या बालकांना जन्मतःच डोळ्यांना मोठी समस्या असल्याचे दिसून आले. उपचार केले नाही तर अंधत्व येणार याची कल्पना आई – वडिलांना देण्यात आली. मात्र यावेळी आई – वडिलांनी पैशाची जमवाजमाव करून मुलाला घेऊन थेट कोल्हापुरला गेले. तिथे मुलाला इंजेक्शन दिले. पण मुलीला इंजेक्शन देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी मुलीला इथेच ठेवले. ही बाब जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांना समजताच त्यांनी मुलीच्या उपचारासाठी पुढाकार घेतला आणि त्या मुलीला अखेर जीवनदान मिळाले.
जिल्हा रुग्णालयात एका मातेचे प्रसूती झाली नवजात शिशुविभागात बाळ जन्माला आल्यानंतर 24 तासाच्या आत कान नाक डोळे तपासले जातात त्यानंतरच डिस्चार्ज दिला जातो ही तपासणी केली असता डॉक्टरांच्या असे लक्षात आले की दोन्ही मुलीच्या डोळ्यांच्या पडद्याची समस्या आहे. बालरोग तज्ञनी बालकांच्या डोळ्याचे ऑपरेशन सिव्हील मध्येच करण्यात येईल असे सांगितले मात्र यासाठी जे इंजेक्शन लागणार होते ते इंजेक्शन काही ठराविक डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्येच उपलब्ध आहे असे सांगितले. हे इंजेक्शन कोल्हापूर येथे मिळेल असे सांगितले. यानंतर आई वडिलांनी जुळ्या मुलांपैकी मुलाला कोल्हापूर येथे इंजेक्शन देण्यासाठी नेले. तर मुलीला तिथेच ठेवले. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर डॉक्टरांकडे विचारणा केली असता सारा प्रकार समोर आला. मुलीला इंजेक्शनची गरज होती. दानशूर व्यक्तींकडून हे इंजेक्शन आणून देण्यात येणार होते, मात्र जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः यामध्ये लक्ष घातले. याचवेळी खेड तालुक्यातील प्रशांत पटवर्धन हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यांनी या चिमुकलीच्या इंजेक्शनच्या खर्चासाठी कळल्यानंतर त्यांनी आर्थिक मदत केली. हे इंजेक्शन त्वरित घेण्यात आले. जिल्हाधिकारी, सीईओ आणि प्रशांत पटवर्धन यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे चिमुकलेला नवीन संजीवनी मिळाली.
असा भेदभाव करू नये : संघमित्रा फुले
संबंधित नवजात मुलीवर आम्ही उपचार करण्यासाठी आवाहन करीत असताना प्रशांत पटवर्धन यांनी त्वरित मदतीसाठी पुढाकार घेतला. तसेच जिल्हाधिकारी बी. एन. पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूरानी जाखड यांनी सहकार्य केले त्यामुळेच मुलीवर उपचार होत आहेत. मुलीच्या उपचाराकडे दुर्लक्ष करीत मुलाच्या उपचारासाठी अधिक महत्त्व दिले गेले ही अतिशय चुकीची बाब आहे असा भेदभाव कुणी करू नये, असे जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांनी सांगितले.