(राजापूर / प्रतिनिधी)
आई आणि शाळा या दोघींच्याही ऋणातून आपण कधी मुक्त होऊ शकत नाही आपण आयुष्यात जी काही प्रगती करतो त्यात या दोघींच्याही संस्काराचा मोठा वाटा असतो, त्याची आठवण ठेवत आपण शताब्दी महोत्सव साजरा करता ही खूप आनंदाची गोष्ट आहे असे कौतुगोदगार ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर गिरीश ओक यांनी माडबन येथे काढले. राजापूर तालुक्यातील जि. प. माडबन शाळेच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर गिरीश ओक उपस्थित होते.
ज्येष्ठ नाटककार आणि वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर राजापूर लांजा साखरपा मतदार संघाचे आमदार डॉक्टर राजन साळवी, प्रसिद्ध मूर्तिकार अजिंक्य चौलकर, अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि स्ट्रॉंगेस्ट वुमन ऑफ आशिया अनुजा तेंडुलकर, राजापूरचे गटविकास अधिकारी सुहास पंडित, गटशिक्षणाधिकारी कडू, राहुल वाघधरे, शताब्दी महोत्सव मुंबई समितीचे अध्यक्ष शैलेश वाघधरे, एडवोकेट दत्तराज शिरवाडकर, माडबन सरपंच संजय साखरकर, उपसरपंच शिरवाडकर, श्यामसुंदर गवाणकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न झाल्यानंतर व्यासपीठावर शारदा मातेसमोर दीपप्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रशालेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तर मान्यवरांच्या हस्ते सध्या मराठी शाळेत शिकत असलेल्या सर्व मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे भेटवस्तू देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला. केंद्रप्रमुख तांबे यांनी प्रस्ताविकात शाळेचा संपूर्ण इतिहास मांडताना, शाळाच आपले मनोगत व्यक्त करते अशा स्वरूपात मांडला.
डॉक्टर गिरीश ओक यांचा आमदार राजन साळवी आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांनी शाळेच्यावतीने यथोचित सत्कार केला. आमदार राजन साळवी यांनी डॉक्टर गिरीश ओक आणि वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या कारकर्दीबद्दल आढावा घेतानाच आपल्याला त्यांचा सहवास लाभतो आहे, याबद्दल आभार व्यक्त केले आणि शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नाटककार गंगाराम गवाणकर यांनी आपण या शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचे नमूद करतानाच लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आणि आपल्याला हा शतकोत्सव महोत्सव सर्वांच्या सहकार्याने साजरा करता येतोय त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
शताब्दी सोहळ्यानिमित्त काल व आज असे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गंगाराम गवाणकर लिखित विठ्ठल विठ्ठल आणि वस्त्रहरण या नाटकांचे स्थानिक कलाकारांच्या संचातील नाट्यप्रयोग होणार आहेत संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यु .बी. कांबळे आणि सचिन मोहिते यांनी केले तर आभार मयेकर यांनी मानले.