(पाली)
कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असणाऱ्या हापुस आंब्याला यंदा पाऊस लांबल्याने पहिला मोहोर उशिरा येऊन तो करपा पडल्याने पुन्हा मोहोर आल्याने त्यासोबतच नव्याने तुडतुडा व फळमाशीचा मोठा प्रादुर्भाव झाला असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्याबरोबरच सध्या वाढलेल्या उष्णतेमुळे अतिनिल सुर्यकिरणांचा फटका बसून, हिरवी पाने व लहान फळेही करपत व गळत आहेत. बदलत चाललेल्या दिवसा तीव्र ऊन,मळभ व ढगाळ वातावरण, पाऊस तर रात्री थंडी या वातावरणीय घटकाचा मोठा फटका हा सर्वाधिक आंबा उत्पादकांना बसून, त्यांचे मोठे नुकसान यंदा होणार असल्याचे बागायतदार शेतकरी सांगतात.
यंदा वाढलेल्या उष्णतेमुळे अतिनील सुर्यकिरणांमुळे कोवळी हिरवी पाने करपून गळून पडत आहेत. त्यामुळे उष्णतेचा फटका हा लहान मोठ्या तयार होणाऱ्या फळांनाही मोठ्या प्रमाणात बसून ती अवेळी परिपक्व होत आहेत.यंदाच्या हंगामात आंबा उत्पादकांना तुडतुडा व करपा या रोगांचा फार त्रास झाला मात्र, थ्रिप्सचा त्रास कमी आहे. तुडतुडा व करपा हा दोन टप्प्यांमध्ये झाला होता. सुरूवातीच्या मोहोराच्या ते बारीक आंब्याच्या मध्ये हा आजार होऊन, पहिला मोहोर काळा सुकून गेला, तर बारीक कैरी गळून गेली. त्यामुळे पहिल्या हंगामाचे नुकसान झाले. शिवाय त्यातून वाचलेल्या मोठ्या तयार होणाऱ्या कैऱ्यांवरही फळमाशीचा प्रादुर्भाव होऊन, आंबा काळसर होऊन गळून पडत आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना आंबा बागायतदारांनी सांगितले की, साधारणत: सेंद्रीय आंबा हा ६० ते ७० टक्के परिपक्व झाल्यावर तोडणी केली जाते. त्यामुळे साका होत नाही. परंतु, हाच आंबा नैसर्गिक पध्दतीने पेंढ्यामध्ये ठेवून पिकविला, तर चार दिवसांत पिवळसर होतो. पुढील पाच दिवसांत पिकतो. मात्र, यंदा फळमाशीचा प्रादुर्भाव वाढलेला असल्याने, या प्रक्रियेमध्ये फळाला पेंढ्यामध्ये उष्णता मिळाल्याने, फळामध्ये अंड्यामध्ये असणारी अळी निर्माण होऊन, फळ कुजण्याची प्रक्रिया होत आहे. कारण सेंद्रिय शेतकऱ्यांना रासायनिक औषधांची फवारणी किंवा रायफलिंग चेंबरची प्रक्रियाही सेंद्रिय प्रमाणीकरण प्रमाणपत्र मिळालेले असल्याने, करता येत नाही. त्यामुळे बागायतदार यंदा दुहेरी अडचणीत सापडला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी तालुका मँगो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये यंदा 2500 सेंद्रीय प्रमाणीकरण झालेल्या आंबा उत्पादकांनी सेंद्रिय पध्दतीने मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले होते. परंतू, गतवर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने मोहराची व पालवीची प्रक्रिया लांबली होती. तरीही त्यातून सावरत आंबा बागायतदारांनी आलेल्या मोहराचे संवर्धन करून, छोटी फळे टिकवली. परंतू, त्यावर वातावरणीय चढउतारामुळे नवीन आलेल्या मोहरामुळे मोठ्या प्रमाणावर त्यावर तुडतुडा व फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्याने, फळाच्या परिपक्वतेच्या प्रक्रियेवरही परिणाम होत आहे. त्यामुळे पिकांचा कालावधी लांबत आहे.
वातावरणीय बदलाच्या अखेरच्या टप्प्यामध्ये फळमाशीला पोषक वातावरण मिळून, पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच आंबा एका बाजूला भाजण्याचे व साकाहोण्याची दाट शक्यता आहे. आंबा उत्पादकांना त्याचा फटका बसून, नैसर्गिक आंबा पिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा येत आहे. शिवाय तोडणीची प्रक्रियाही ३ ते ४ दिवसांहून आता १० ते १२ दिवसांपर्यंत जात असल्याने, आंब्याला मागणी असूनही उत्पादन व पुरवठा यांचा मेळ घालताना बागायतदारांची दमछाक होत आहे. शिवाय हंगामी पिक असल्याने वेळेची मर्यादा असल्याने आर्थिक नुकसानही होत आहे.
यावर्षी कोकणात मोठ्या प्रमाणावर वातावरणीय बदलांचा झालेला परिणाम हा आता हवेतील जीवजंतूच्या जीवनचक्रावर होऊन त्यांनी निसर्गाच्या बदलाशी समरूप होत आपली प्रजनन क्रिया बदलली आहे. त्यामुळे पुन्हा नवीन मोहोर आल्यावर तुडतुडयाची नवी पिढी तयार होऊन उपद्रव देते आहे म्हणजेच ही निसर्गाची जिवनसाखळीची प्रक्रिया माणसाने समजून घेऊन केवळ रासायनिक औषधांचा मारा न करता जैविक पद्धतीने नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे शिवाय उष्णतेमुळे पाने करपणे, फळे गळणे याकरिता संपूर्ण झाडावर पाने व फळांसहीत १० टक्के प्रभावी चुन्याचे पाणी व्यवस्थित फवारावे. लहान फळे असणाऱ्या झाडांना पाणी द्यावे यामुळे अतिनिल सुर्यरिकणांपासून व बाष्पीभवनाची प्रक्रिया नैसर्गिक पध्दतीने रोखून, फळगळतीही रोखली जाऊ शकते. फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागेमध्ये भक्षक सापळे लावावेत.