[ रत्नागिरी /विशेष प्रतिनिधी ]
पत्रकार शशिकांत वारिशे यांना – गाडीखाली चिरडून मारणारा पंढरीनाथ आंबेरकर हा साधारण परिस्थिती असलेला व्यक्ती करोडपती कसा झाला अशी चर्चा आता सुरू झाली आहे. आलिशान गाड्या, दागदागिने, ट्रॅव्हल्सचा व्यवसाय, सतत नोटांनी भरलेले खिसे अशी सर्व माया त्याने जमवली ती केवळ आणि केवळ रिफायनरीसाठी जमिनींची दलाली करून. परप्रांतीयांना चौपट भावाने जमिनी विकून आंबेरकरने गडगंज संपत्ती कमावली. नाणारमधून त्याने सुरुवात केली आणि नाणारमध्ये रिफायनरी होणार नाही हे समजताच बारसूमध्ये मोर्चा वळवला. तिथे त्याच्या या कारनाम्यांनी कळस गाठला. रिफायनरीवाल्यांनी आंबेरकरला पोसले आणि आर्थिक बळ दिले. पंढरीनाथ आंबेरकर हा राजापूरच्या कुंभवडे गावात राहणारा. पंढरी म्हणून त्याची पंचक्रोशीत ओळख आहे. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. आंब्यांचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारा आंबेरकर घरे दुरुस्तीची छोटी-मोठी कंत्राटेही घ्यायचा. २०१७ मध्ये नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित झाला तेव्हा त्याने काही साथीदारांबरोबर जमिनींच्या दलालीमध्ये पाय ठेवला. त्यातून त्याला भरपूर पैसा मिळू लागला. रिफायनरी होणार म्हणून आसपासची जमीन खरेदी करण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. त्यामध्ये परप्रांतीयही होते. आंबेरकर आणि टोळीने त्यांच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली. दुसरीकडे स्थानिक शेतकऱ्यांनाही आमिषे दाखवू लागले. सरकारने प्रकल्पासाठी जमीन घेतली तर जी नुकसानभरपाई मिळेल त्यापेक्षा चौपट पैसे देतो असे सांगून गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी मिळवल्या. शेतकरी आणि जमीन खरेदी करणारे परप्रांतीय अशी दोन्ही बाजूंनी आंबेरकरला लाखो रुपये टक्केवारी मिळत होती. दलालीतून मिळणारा हा भरमसाट पैसा आंबेरकरने ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात गुंतवला. १४ जानेवारी २०१८ रोजी कुंभवडे गावामध्ये कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष संघटनेने सभा घेतली होती. आंबेरकर आणि त्याच्या गुंडांनी ती सभा उधळवून टाकायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी त्याला चांगलाच चोप दिला होता.
नाणार रिफायनरी प्रकल्प २ मार्च २०१९ रोजी रद्द झाला. दरम्यान, रिफायनरी कंपनीचे अधिकारी आंबेरकरच्या संपर्कात आले होते. वेगवेगळ्या गावांमधून रिफायनरीसाठी समर्थनपत्रे जमा करण्याची जबाबदारी त्यांनी आंबेरकरवर सोपवली होती. नाणारला रिफायनरी होणार नाही म्हणून याच आंबेरकर आणि टोळीने समोरच्या सड्यावरील बारसू- सोलगाव पंचक्रोशीकडे मोर्चा वळवला.
२०१९-२० मध्ये बारसूमधील २३०० एकर जमिनीवर एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली. त्यासाठी भूसंपादन सुरू केले गेले. कोरोना काळात ती प्रक्रिया थांबली. नंतर एमआयडीसीसाठी निश्चित केलेल्या जागेसह आसपासच्या परिसरातील जागेवर रिफायनरी उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या. राजकीय वरदहस्तासाठी आंबेरकरने कोकण जनकल्याण समिती स्थापन करून त्याचा अध्यक्ष बनला. त्यानिमित्ताने प्रत्येक राजकीय शिष्टमंडळाबरोबर तो फिरायचा. फोटो काढायचा आणि प्रसिद्धीही मिळवायचा.
आंबेरकरने सरपंचाच्या मुलालाही बाईकने उडवले होते
आंबेरकर हा रिफायनरीला विरोध करणाऱ्या प्रत्येकालाच गाडीखाली चिरडून टाकण्याच्या धमक्या द्यायचा. २३ एप्रिल २०२० रोजी त्याने कुंभवडे गावचे सरपंच पंढरीनाथ मयेकर यांचा मुलगा मनोज मयेकर याच्या अंगावर दुचाकी घालून त्याला जखमी केले होते. १३ सप्टेंबर २०२२ मध्ये त्याने रिफायनरीविरोधक कार्यकर्त्यांच्या डोक्यात चिऱ्याचा दगड मारण्याचा प्रयत्न केला होता. जवळ पैसा खेळू लागल्याने आणि राजकीय वरदहस्तही मिळाल्याने आंबेरकर हा हिंसकही बनला होता. त्यामुळे त्याची राजापुरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.