(रायगड / चंद्रकांत कोकणे)
रायगड आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा आणि पोलादपूरकडुन महाबळेश्वरकडे जाणाऱ्या आंबेनळी घाटामध्ये कालिका माता पॉईंटजवळ दरड कोसळल्याने आंबेनळी घाट दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे. दरड हटविण्याचे काम युद्ध पातळींवर सुरु असून प्रवाशांनी महाबळेश्वरकडे जाण्यासाठी ताम्हणी घाटातून जाणाऱ्या मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर महाड आणि पोलादपूर तालुक्यात असलेल्या घाट मार्गामध्ये दरडी कोसळण्याची दाट शक्यता असल्याने दरडी प्रवण क्षेत्रात यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. बुधवारी पहाटे आंबेनळी घाटातील कालिका माता पॉईंट नजीक दरड कोसळल्याने महाबळेश्वर, सातारा मार्ग बंद करण्यात आला आहे. प्रवाशांनी आंबेनळी घाट मार्गाने न जाता ताम्हणी मार्गाने प्रवास करावा असे आवाहन रायगडचे जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.
दरम्यान, महाडकडून पुण्याकडे जाणारा वरंद घाटातील वाहतुकी बाबतही मोठा निर्णय घेतला जाणार आहे. या घाटातील अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.