(रत्नागिरी/प्रतिनिधी)
पश्चिम घाटाला जोडणारा आंबा घाट हा गुन्हेगारांना सुरक्षित असा वाटत असल्याने या ठिकाणी खून करून मृतदेह दरीत फेकून देण्याचे प्रकार वाढीस लागले असल्याची चर्चा आहे. 7 मार्च 2020 मध्येही एकाचा तीक्ष्ण हत्याराने खून करून मृतदेह आंबा घाटाच्या दरीत टाकला होता. मृतदेह कुजल्यानंतर त्या खुनाला वाचा फुटली होती. काल शुक्रवारी पुन्हा एकदा रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील खोल दरीत सकाळी अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. अज्ञात पुरूष मृतदेहाच्या मानेभोवती दोरी व दोन्ही हात बांधलेल्या स्थितीत आढळल्याने घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
देवरूख पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बाबतची फिर्याद मिथिल जाधव ( कोसुंब ) यांनी दिली. निखिल जाधव आपल्या कुडवली येथील काजू बागेची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी सकाळी कोल्हापूरहून आंबाघाटमार्गे येताना लघुशंकेसाठी थांबले असता दरीमध्ये त्यांना मृतदेह दिसला. घाटातील गायमुखापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर १५० खोल दरीत अज्ञात पुरूषाचा मृतदेह असल्याची खबर त्यांनी देवरूख पोलीसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी पोहोचले. यावेळी मृतदेह दरीतून बाहेर काढण्यासाठी राजू काकडे हेल्प अँकॅडमीच्या टिमला पाचारण करण्यात आले.
यानुसार अँकॅडमीचे अण्णा बेर्डे, दिलीप गुरव, चंद्रकांत भोसले, प्रविण परकर यांनी घटनास्थळी जावून मृतदेह दुपारनंतर दरीतून बाहेर काढला. या अज्ञात पुरूष मृतदेहाचे वय अंदाजे २५ ते ३० असून त्याचा घातपात करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
2020 साली सापडला होता असाच कुजलेल्या अवस्थेत मृतदेह
येथील चक्री वळणानजीक संरक्षण भिंतीजवळ ७ मार्च २०२० रोजी कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह मिळून आला होता. मृतदेहावर तीक्ष्ण हत्यारांच्या खुणा होत्या. यावरून तो खून होता, हे स्पष्ट झाले होते. आरोपींनी गोणीत भरून मृतदेह दरीत फेकून दिला होता. पुरावा नसल्याने मृतदेहाची ओळख पटली नव्हती. हा मृतदेह ३० ते ३५ वर्षीय तरूणाचा असल्याचे वाटत होते. मयताचे अंगावर असणारा शर्ट हा लांजा देवराई येथील बेपत्ता प्रकाश भोवड या इसमाचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. यानंतर प्रकाश भोवड याचे नातेवाईकांना बोलावल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली होती. ४ मार्च २०२० रोजी मयत प्रकाश भोवड व त्याचे दोन मित्र रूपेश दयानंद कोत्रे (रा. लांजा शेवरवाडी) व सतिश चंद्रकांत पाल्ये (रा. कोंड्ये पाल्येवाडी) यांनी एकत्रित जेवणाची पार्टी केली होती अशी माहिती पुढे आली आणि पोलिसांनी दोघांचा माग घेऊन रूपेश कोत्रे व सतिश पाल्ये या दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या.
आर्थिक देवाणघेवाणीतून हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकाशची कर्जाऊ दिलेले पैसे गोळा करणारा अशी ख्याती होती. त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील डेअरी व्यवसायीक राजू मुलाणी याच्याकडून सहा लाख कर्जाऊ रक्कम वसूल करण्याची सुपारी घेतली होती. राजू याने कर्जाऊ रक्कम गडहिंग्लज येथे फिरवली होती. परंतु, या रकमेची वसुली होत नसल्याने त्याने प्रकाशला सुपारी दिली होती. प्रकाशने कामाला सुरूवात केली. त्याने काही रक्कम वसूलही केली, परंतु ती त्याने राजू याला दिली नाही. उलट वसूल केलेले ३५ हजार रुपये प्रकाशने खर्च केले होते. तसेच, राजूला दमदाटी करू लागला. अखेर वैतागलेल्या राजूने त्याचा काटा काढायचे ठरविले. त्याने प्रकाशला कोल्हापूर जिल्ह्यातील शिरढोणमधील घरी बोलावले. त्या ठिकाणी राजू आणि प्रकाश यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. रागाच्या भरात राजूने धारधार शस्त्र प्रकाशच्या डोक्यात मारले आणि प्रकाश ठार झाला. त्याचा जीव गेला हे समजताच राजूने मित्र ईश्वर आडसुळे याला मदतीला बोलावले. २० मार्चच्या रात्री त्यांनी प्रकाशचा मृतदेह कारने रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाटात आणून टाकला.
प्रकाशला ठार केल्यानंतर राजूने प्रकाशसह आपल्या साथीदाराचे मोबाईल शिरढोण गावातच बंद केले. त्यामुळे मोबाईल लोकेशनवरुन आरोपींचा माग काढणे अवघड ठरत होते. मात्र, आंबा घाटात मृतदेह ज्या गोणीत भरून फेकण्यात आला त्याचा एक धागा पकडत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि देवरुख पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि हत्येचा तिढा सोडवला.
अशा अनेक प्रकारांमुळे आंबा घाट गुन्हेगारांना आधार बनत असल्याचे स्पष्ट होत आहे. रात्रीच्या ठिकाणी येथे पोलिसांचा पहारा असणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे, अन्यथा नयनरम्य असलेला हा आंबा घाट अशा प्रकारांमुळे गुन्हेगारांना वरदान ठरून बदनाम होईल एवढे मात्र नक्की !