(विजयनगरम)
आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात रविवारी दोन प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर ४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
विशाखापट्टणमहून रायगडकडे जाणा-या प्रवासी रेल्वेची पलासा एक्स्प्रेसला समोरासमोर धडक झाली. या धडकेमुळे विशाखापट्टणमहून-रायगडकडे जाणा-या रल्वेचे तीन डबे रुळावरून घसरले. दोन रेल्वेंची समोरासमोर धडक झाल्याने यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. वृत्त लिहिपर्यंत ६ प्रवासी ठार, तर ४० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात आले. अपघातस्थळी बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या अपघातानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी तातडीने मदत आणि उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी विशाखापट्टणम आणि विजयनगरमच्या जवळच्या जिल्ह्यांमधून शक्य तितक्या रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या. तसेच जखमींना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून दिली जात आहे.
रेल्वेचे अपघात प्रूफ सुरक्षा कवच : अश्विनी वैष्णव
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मे 2022 मध्ये ट्रेनमध्ये बसवल्या जाणार्या आर्मर सिस्टमबद्दल सांगितले होते. ते म्हणाले होते- ‘कवच हे स्वयंचलित रेल्वे संरक्षणाचे तंत्रज्ञान आहे. यात असे होते की समजा एकाच रुळावर दोन गाड्या चुकून आल्या, तर आरमार ब्रेकने ट्रेन जवळ येण्याआधीच थांबते, ज्यामुळे अपघात होण्यापासून टळतो. रेल्वेमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर रेल्वे रुळावरून घसरल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.