(पुणे)
राज्य लोकसेवा आयोगाने वर्णनात्मक परीक्षा पद्धत २०२५ पासून लागू करावी याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. मात्र, अद्याप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. पुण्यात मागील ३६ तासांपासून एमपीएससी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे हे विद्यार्थी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. हे सर्व विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रात्री ११ वाजता आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बैठक घेऊ. या बैठकीला मीही उपस्थित राहीन, असं आश्वासन त्यांनी दिलं.
जोपर्यंत एमपीएससी वर्णनात्मक परीक्षेबाबत निर्णय घेणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. आंदोलनस्थळी येताना आपली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर येत्या दोन दिवसांत यावर चर्चा करू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असल्याची माहिती शरद पवार यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना दिली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर होणाऱ्या संबंधित बैठकीला कोण-कोण हजर राहणार? अशा पाच विद्यार्थ्यांची नावंही आपल्याला कळवावीत. या पाच विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ घेऊन मी या बैठकीला जाईल, असं आश्वासन शरद पवारांनी दिलं.
आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी अनेकवेळा आंदोलने करुनही आयोगाने निर्णय घेतला नाही. त्यामुळे जोपर्यंत आयोग वर्णनात्मक परीक्षा घेण्याचा निर्णय घेणार नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. तर एमपीएससी जोपर्यंत अधिकृतपणे नोटिफिकेशन काढणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकानी सांगितले.