(रत्नागिरी)
संस्थाने खालसा होताना पेन्शन घेऊन राणी लक्ष्मीबाईंना जगता आले असते. पण राणीने जीवावर बेतून प्रतिकूल स्थितीत प्रतिकार केला तो फक्त राष्ट्रवादासाठी देशभक्ती जागवली पाहिजे, याकरिता तिने बलिदान दिले ते फक्त स्वातंत्र्य, देशभक्ती व राष्ट्रवादाचे स्फुल्लिंग यामुळेच. आज राष्ट्रभक्ती शिकवण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादाचे उदाहरण द्यायचे असेल तर स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्वांचे स्मरण करणे आवश्यक आहे, असेसे प्रतिपादन गोव्याचे लोकायुक्त, माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी केले.
मराठा भवन येथे अॅड. विलास पाटणे यांच्या झाशीची राणी लक्ष्मीबाई पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. या वेळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले की, कोकणात भक्तीभाव आणि लोककला आहेत. राणी लक्ष्मीबाई मुळच्या कोकणातील लांजा तालुक्यातील असल्याने त्यांनी झांशी संस्थानात या कलांना प्रोत्साहन दिले. धर्माच्या माध्यमातून संस्कारित पिढी घडवता येईल हे राणीने ओळखले होते. हा कोकणच्या संस्कारांचाच भाग होता. हे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणून नक्कीच वापरले जाणार आहे.
लेखक ॲड. विलास पाटणे यांनी मनोगतामध्ये झांशीची राणी लक्ष्मीबाईंची महती सांगितली आणि हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली हे सांगितले. त्यानंतर शौर्य चक्रविजेते कमांडो पथकाचे प्रमुख मधुसूदन सुर्वे यांनी ऑपरेशन हिफाजत, इंफाळ (मणिपूर) याची चित्तथरारक माहिती सांगून श्रोत्यांना खिळवून ठेवले. या ऑपरेशनमध्ये त्यांच्या पायात व पोटात ११ गोळ्या घुसल्या होत्या. प्रतिकूल स्थिती, प्रचंड पाऊस आणि ढगाळ वातावरणात हे ऑपरेशन यशस्वी केले. झाशीच्या राणीचा जयजयकार करून नारीशक्तीमुळे आपण असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवतर, खेड येथील सुर्वे हे चौथ्या पिढीत सैन्यदलात कार्यरत होते. आपला गौरवशाली इतिहास सांगितला जात नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. सैनिकांचा इतिहास, वीरगतीप्राप्त झालेल्या सैनिकांच्या रंजक कथा मुलांना पाठ्यपुस्तकातून अभ्यासायला द्यायला हव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
व्हाईस अॅडमिरल अभय कर्वे यांनी सांगितले की, राणी लक्ष्मीबाईंचे शौर्य सर्वांना माहिती आहे. पण अॅड. पाटणे यांनी सर्व इत्थंभूत माहिती देऊन पुस्तक सजवले आहे. भारतीय सेनेची तिन्ही दले प्रत्येक क्षणी भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज आहेत. देशसेवा बजावताना ते घरी परत येतील की नाही, याची शाश्वती नसते. या साऱ्यातून कुटुंबियांनाही जावे लागते. कुटुंबियांना ताणतणाव सहन करावा लागतो. सैनिक कधीही हे नाही, ते नाही असे म्हणू शकत नाहीत, जी स्थिती आहे त्या स्थितीत जाऊन शत्रूला पराजित करण्याचे आव्हान असते. राणी लक्ष्मीबाई या कोकणच्या. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरखेल कान्होजी आंग्रे हेसुद्धा कोकणातील. त्यांनी पश्चिम किनारपट्टी मराठ्यांकडे ठेवली. कोकणने नेहमीच इतिहासात शौर्य दाखवले आहे. याची जाणीव कोकणवासियांनी ठेवली पाहिजे.
राणी लक्ष्मीबाईंच्या नेवाळकर घराण्यातील राजू नेवाळकर आणि मुखपृष्ठ साकारणारे गौरव पिळणकर यांचा या वेळी पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन सौ. पूर्वा पेठे यांनी केले. गायिका ईशानी पाटणकर हिने म्हटलेल्या पसायदानाने सांगता झाली. स्व. आमदार कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालयाचे अध्यक्ष विश्वनाथ बापट यांनी आभार मानले.
लक्ष्य फाउंडेशन अध्यक्ष सौ. अनुराधा प्रभुदेसाई म्हणाल्या की, पुणे, कोलकाता, मुंबईप्रमाणे रत्नागिरीतही कारगिल महोत्सव घेण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी रत्नागिरीकरांची साथ हवी आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे याची जाणीव युवा पिढीत व्हायला हवी. जनमानसाला कीड लागलेली असताना राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्याची कथा मांडावी हे अॅड. पाटणे यांना वाटणे हे आताच्या काळात खूप महत्त्वाचे आहे. त्यांचे लेखन हृदयाला भिडणारे आणि राष्ट्रभक्ती जागवणारे असते हे विशेष आहे, अशा शब्दांत अॅड. पाटणे यांचे कौतुक केले.
मराठी पुस्तक भरती करा
मराठी पुस्तके अस्तंगताच्या मार्गावर आहेत, असे विधान करत घरटी दर महिना एक तरी मराठी पुस्तक खरेदी करून वाचावे, असे आवाहन न्या. अंबादास जोशी यांनी केले. मराठीला बोलण्यात दुय्यम स्थान दिले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मराठी पुस्तकांचे रसग्रहण व्हायला हवे तरच चोखंदळ वाचकांची चळवळ सुरू राहील. आपण हॉटेलमधील जेवण कसे होते, यावर चर्चा करतो मग वाचलेल्या पुस्तकावर का करत नाही, असा सवाल करून पुस्तके खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले.