(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरालगत मिरजोळे कलिकानगर फिनोलेक्स कॉलेज जवळ राहणारे फिर्यादी व त्यांचे पती यांना त्यांचे शेजारी राहणारे शेलेंद्र भाटकर, सुहासिनी भाटकर यांनी मारण्यासाठी लोखंडी रॉड उगारून फिर्यादी यांना जातीवाचक व अश्लील शिवीगाळ केली अशी तक्रार फिर्यादी महिलेने आरोपी यांचेविरोधात केली होती. सदर फिर्यादी नुसार शहर पोलिस ठाणे येथे अनुसूचित जाती व जमाती अत्याचार अधिनियम कलम ३(१)(s),३(२), भा.द.वी.कलम ३५४(अ),५०९,३५२,५०४,५०६ अन्वये दि.१३जुलै २०२३रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्हाकामी अटक होईल या भीतीने आरोपी यांनी न्यायालयात त्यांचे वकील ॲड.मनिष नलावडे यांचेमार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
सदर जामीन कामी फिर्यादी यांनी सरकारी वकिलांचे मदतीला खाजगी वकील देऊन अटकपूर्व जामिनासाठी विरोध दर्शविला होता. बरेच दिवस या जामीन अर्जाची सुनावणी न्यायालयात चालू होती. आरोपी यांचा वकिलांनी पूर्वीचा जमिनीचा वादाला फिर्यादी यांनी खोडसाळपणे जातीयस्वरूप आणून खोटी फिर्याद दाखल केली असल्याचा जोरदार युक्तिवाद करून सर्वाच्च न्यायालयाचे अनेक दाखले मांडले होते.
सदर युक्तिवाद ग्राह्य असल्याचे मानून रत्नागिरी येथील मे.जिल्हा व सत्र न्यायालय यांनी आरोपी यांची रक्कम रुपये २५,०००/- या रकमेचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. आरोपी यांचा वतीने ॲड.मनिष नलावडे, ॲड.तनया सावंत यांनी काम पाहिले.