( लांजा / प्रतिनिधी )
लांजा एसटीच्या कंडक्टरने दिवसभर प्रवाशांना फुकट एस. टी. ची तिकिटे वाटल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दिवसभरात जेवढ्या फेऱ्या झाल्या त्या सर्व फेऱ्यांमध्ये प्रवाशांकडून कंडक्टरने पैसेच घेतले नाही. मात्र हा कंडक्टर दिवसभर एवढ्या फेऱ्या झाल्या तरी पैसे का घेत नाही. सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला.
याबाबत अनेकांनी त्यांच्याकडे याबाबत चौकशी केली. त्यानंतर त्या कंडक्टरने सांगितले की, एसटीच्या नोकरीतून सेवानिवृत्ती घेतल्याने शेवटच्या दिवशी प्रवाशांकडून पैसे घेतले नाही. या प्रवाशांचे पैसे मीच भरणार! हे कारण ऐकून साऱ्यांचे समाधान झाले. मात्र फुकट्या प्रवाशांना खूपच आनंद झाला.
लांजा आगारातील वाहक सुल्तान इब्राहीम मापारी हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी शेवटच्या दिवशी सामाजिक आणि एसटी प्रवाशांशी बांधिलकी जपली आहे. असे करणारे महाराष्ट्रातील ते पहिले वाहक असल्याचे आगार प्रमुख संदीप पाटील यांनी निरोप समारंभ कार्यक्रमावेळी सांगितले.
सुल्तान मापारी हे लांजा तालुक्यातील देवधे येथील रहिवासी आहेत. या काळात त्यांनी 30 वर्षे निष्कलंक उत्तम सेवा दिली. सेवानिवृत्तीनंतर लांजा अगाराच्यावतीने त्यांचा निरोप समारंभ 30 जून रोजी लांजा आगारात पार पडला. त्यांनी दिलेल्यासेवेबद्दल तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसल्याने त्यांना एक वेतनवाढ जादा व त्याचा फरक देण्यात आला
निरोप समारंभावेळी सेवानिवृत्तीच्या दिवशी सुल्तान मापारी हे वाहकाच्या गणवेशात आल्याने त्यांनी आगाराचा व महामंडळाचा आदर राखल्यामुळे सर्वांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी महंमदशेठ रखांगी, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, कर्मचारी राजू पाटोळे, दिलीप सावंत, चंद्रकांत झोरे, राजेशिर्के तसेच मापारी यांचे सर्व कुटुंबीय व लांजा आगारातील इतर कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.