( रत्नागिरी / प्रतिनिधी )
अस्वस्थेतून साहित्याची निर्मिती होते. स्वस्थ मनुष्य हा कधीच निर्मिती करु शकत नाही. लेखकाच्या मेंदूत अस्वस्थेची वादळे घोंगवत असतात. ज्या दिवशी तो स्वस्थ झाला तेव्हा तो संपला असे म्हणायला हरकत नाही, लेखकाचा मृत्यू त्याच्या स्वस्थतेंनंतर येतो, असे भाष्य अ. भा. मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष भारत सासणे यांनी नवनिर्माण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात प्रकट मुलाखतीत बोलताना केले.
नवनिर्माण संस्थेचे एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त रविवार २२ जानेवारी रोजी अ. भा. मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष भारत सासणे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. दूरदर्शनचे माध्यम सल्लागार जयू भाटकर यांनी ही मुलाखत घेतली. या कार्यक्रमाला नवनिर्माण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, सौ. मीना सासणे, सौ. सीमा हेगशेट्ये उपस्थित होते.
आपल्या मुलाखतीतून सासणे यांनी आपल्या कारकिर्दीचे एकेएक पैलू उलगडले. जयू भाटकर यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला रोखठोक आणि समर्थपणे उत्तरे दिली. साहित्य निर्मितीमागच्या प्रेरणेबाबत बोलताना सासणे म्हणाले की, जीवनातील संघर्ष, महाविद्यालयीन जीवन, वाचन करणाऱ्या मित्रांची संगत आणि साहित्यातील पुर्वसु्रींनी केलेल्या संस्कारातून साहित्याची निर्मिती होते. अस्वस्थ मानसिकतेतून उच्च प्रतीची निर्मिती होते. जगातील नामवंत लेखक याच मानसिकतेतून घडत आले आहेत. त्यांच्या साहित्यकृती नावारूपाला आल्या आहेत.
ते पुढे म्हणाले, वयाच्या साठीनंतर उर्दू शिकल्याने आणि नोकरीच्या काळात तत्कालीन परिसरातील उर्दू भाषेचे संस्कार झाल्यामुळे माझ्या साहित्यात उर्दू भाषेचे संस्कार दिसतात. उर्दू या समृद्ध भाषेतील साहित्य मराठीत यावे, यासाठी हा अट्टाहास केल्याचे सासणे म्हणाले.
सुमारे तासभर चाललेल्या मुलाखतीत सासणे यांनी आपले शालेय, महाविद्यालयीन जीवन, साहित्य निर्मिती, अनुवाद तंत्र, साहित्याची भाषा, साहित्य संमेलनातील भाषणावेळचे अनुभव, वांगमयीन प्रवाह यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रा. सचिन टेकाळे यांनी आपल्या ओघवत्या निवेदनाने केली. त्यानंतर अभिजित हेगशेट्ये यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करुन कार्यक्रमाला दिशा दिली. हा कार्यक्रम रंगतदार झाला. या प्रसंगी रत्नागिरीतील साहित्य रसिक, विचारवंत, बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. सचिन टेकाळे यांनी केले.