(रत्नागिरी)
मंगळवार १३ जून रोजी जयस्तंभ ते कुवारबावकडे जाणाऱ्या रिक्षामध्ये बसलेल्या तरुणीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या रिक्षा चालकाला गुरुवारी न्यायालयाने रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अविनाश म्हात्रे (३५, रा.शांतीनगर, रत्नागिरी ) असे त्या संशयित रिक्षा चालकाचे नाव आहे.
मंगळवारी दुपारी एक १८ वर्षीय तरुणी सहप्रवाशासोबत अविनाशच्या रिक्षामधून आपल्या घराकडे जाण्याकरिता प्रवास करत होती. प्रवासादरम्यान व सहप्रवासी रिक्षातून उतरल्यावर चालकाने या तरुणीसोबत असभ्य व अश्लील वर्तन केले. या तरुणीने मोठया हुशारीने या रिक्षाचा नंबर लिहून घेतला, तसेच सोशल मिडीयावर पोस्ट करून मदतीची साद घातली. तसेच घडलेल्या घटनेबाबत रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिस ठाणे येथे रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन त्याचा शोध घेऊन रत्नागिरी शहर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. गुरुवारी अविनाशला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची रवानगी रविवारपर्यंत पोलिस कोठडीत केली आहे.