(रत्नागिरी)
मे महिन्यात कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतातच त्याचबरोबर नागरिकांची पुण्या-मुंबईत ये-जा सुरू आहे. एसटी महामंडळ बरोबरच कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. परिणामी खासगी बसेसकडे प्रवाशी वळू लागले आहेत. याचा फायदा काही ट्रॅव्हल्स धारक चांगलाच घेऊ लागल्याने रत्नागिरी आरटीओ विभागाकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती या महिनाभरात ४०१ वाहनांची तपासणी करून २० लाखांचा करवसुली आणि ३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती आरटीओ जयंत चव्हाण यांनी दिली.
जादा भाडेदर आकारणी करू नये तसेच प्रवासी वाहतुकीची नियमावली अंमलबजावणी काटेकोरपणे करावे असे आवाहन करणारे पोस्टर्स आरटीओ कार्यालयाने ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बाहेर वगैरे लावले आहेत. मात्र अद्यापही काहीजण नियमावलीचे पालन करत नसून नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्याने उन्हाळी सुट्टी पडल्यापासून आरटीओ विभागाकडून कारवाई आणि तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत ४०१ खासगी बसेसची तपासणी करण्यात आली यामध्ये ३९ खासगी बसेसना नोटिसा बजावण्यात आल्या तर २० लाख करवसुली आणि ३ लाख दंड वसूल असे एकूण २३ लाख वसुली करण्यात आली आहे. दरम्यान, आलेल्या ३९ पैकी २९ प्रकरणे निकाली नोटिसा बजावण्यात काढण्यात आल्याचेही आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात आले.