“जेव्हा एखादा व्यक्ती किंवा त्याचा जवळचा नातेवाईक अवयवदान करून, गरजू व्यक्तीला, ज्याला जगण्यासाठी अवयवांची गरज असते, मदत करतात.” याला अवयवदान म्हणतात. 18 वर्षावरील कोणताही व्यक्ती आपल्या मर्जीने अवयवदान करू शकतो. अवयवदान कायद्यानुसार, अवयवांची खरेदी-विक्री अवैध आहे. भारतात अवयवदान प्रक्रिया केंद्र सरकारच्या कायद्यानुसार पार पडते. वैद्यकीय क्षेत्रात अवयवदान हे इतर समाजकार्यांप्रमाणेच मोठे समजले जाते. आपल्याकडे दान खूप् महत्त्वाचं मानलं जातं.
अन्नदान, जलदान, धनदान, विद्यादान, रक्तदान ही सगळीच दाने श्रेष्ठ मानली गेली आहेत. याच यादीत अजून एक नाव जोडणे गरजेचे आहे, ते म्हणजे अवयवदान. जिवंतपणी आणि मृत्यूनंतरसुद्धा हे दान करून गरजूंचे प्राण वाचवता येतात. एका व्यक्तीने दान केलेले अवयव दुसऱ्या गरजू व्यक्तीच्या शरीरात बसवले जातात, म्हणजेच प्रत्यारोपित केले जातात. आज अवयवदान चळवळीत अनेक मृत रुग्णांच्या कुटुंबियांकडून स्वतःहून अवयवदान चळवळीला सहकार्य केले जात आहे. या अवयवदानाबाबत अधिक माहिती जाणून घेऊया
अवयवदान म्हणजे नक्की काय?
शारिरीक समस्यांमुळे तसेच औषधांच्या दुष्परिणामांमुळे माणसाच्या शरीरातील अवयव व्यवस्थित कार्य करत नाहीत. कित्येकांचे अवयव निकामी होत जातात. या रुग्णांना नव्या अवयवाची गरज असते. अशा अनेक रुग्णांना अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून नवे अवयव देता येतात. मृत रुग्णाच्या शरीरातून अवयव पूर्णपणे निकामी होण्याअगोदर डॉक्टर शरीरातून अवयव काढतात, ठराविक वेळेअगोदरच गरजू रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाते. 18 वर्षावरील कोणताही व्यक्ती आपल्या मर्जीने अवयवदान करू शकतो. व्यक्ती जिवंत असताना स्वत: निर्णय घेऊन किंवा एखाद्या व्यक्तीचा मेंदू मृत झाला असेल तर, त्याच्या जवळचे नातेवाईक त्या व्यक्तीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेऊ शकतात.
अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय
- मृत व्यक्तीच्या किंवा जिवंत व्यक्तीच्या फुफ्फुसाचा किंवा मूत्रपिंडाचा काही भाग शस्रक्रियेद्वार वेगळा करुन गरजू रुग्णाच्या शरीरात देणे म्हणजे अवयव प्रत्यारोपण होय. ही प्रमाणित वैद्यकीय उपचार पद्धती आहे.
- कोणत्या अवयवांचे दान करता येते – मृत रुग्णाचे हृदय बंद पडले असेल तर केवळ डोळे आणि त्वचेचे दान करता येते. हृदय बंद पडल्याने इतर अवयवांना रक्त पुरवठा बंद झालेला असतो. त्यामुळे इतर सर्व अवयव प्रत्यारोपणासाठी बाद ठरतात.
- उपचारादरम्यान किंवा अपघातानंतर रुग्ण कित्येकदा ब्रेन डेड होतो. या अवस्थेत रुग्णाची जगण्याची शक्यता नसते. परंतु हृदयप्रक्रिया सुरु असते. अशा रुग्णाकडून अनेक अवयवांचे दान करता येते. मूत्रपिंडे, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंडे, हृदय, आतडी, नेत्र, त्वचा, हृदयाची झडप आणि कानाचे ड्रम यांचे दान करता येते.
अवयवदान कायदेशीर प्रक्रिया
- देशात मानवी अवयव प्रतिरोपण कायदा १९९४ नुसार ब्रेन डेड डॉक्टरांनी विशिष्ट चाचण्यानंतर घोषित करणे आणि अवयवदान या दोघांनाही कायदेशीर मान्यता आहे.
- ब्रेन डेड हे प्रत्यारोपणासाठी मान्यता असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या तपासाअंती घोषित केला जातो.
- मानवी अवयवांच्या व्यापाराला या कायद्यात कायदेशीर मान्यता नाही. तसेच या कार्यात कोणताही आर्थिक व्यवहार करता येत नाही.
- दात्याच्या कुटुंबीयांना अवयव मिळालेल्या रुग्णाचे नाव व पत्ता दिला जात नाही. कायद्यानुसार यासाठी परवानगी दिली जात नाही. रुग्णालादेखील दात्याची तसेच त्याच्या कुटुंबीयांची माहिती दिली जात नाही.
अवयवदानाची प्रक्रिया
- जिवंतपणीच रुग्णाने अवयवदानाचा निर्णय घेतला असेल तर रुग्णाने कुटुबीयांना याबाबतची कल्पना देणे आवश्यक ठरते. कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय मृत्यूपश्चात अवयवदान करता येत नाही.
- अवयवादासाठी प्रत्येक राज्यातील रुग्णालये तसेच रुग्णालयाशी निगडीत अवयव प्रत्यारोपण समिती कार्यरत असतात.
जिवंत असताना अवयवदान करणाऱ्यांमध्ये अत्यंत जवळचे नातेवाईक (Near Related Donors) आणि Non-near relative donors किंवा सोप्या भाषेत लांबचे नातेवाईक असे दोन प्रकार आहेत.
- अत्यंत जवळच्या नातेवाईकांमध्ये- पती, पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ-बहीण, आजी-आजोबा आणि नातू किंवा नात यांचा समावेश होतो
- Non-near relative donors मध्ये काका, मामा, त्यांची मुलं येतात. हे अवयवदाते गरजू व्यक्तीवरचं प्रेम किंवा आत्मियता असल्यामुळे अवयवदान करू शकतात.
ही आहे भारतातील परिस्थिती
– भारतातील जवळपास पावणे दोन लाख रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत, पण केवळ पाच हजार लोकांना प्रत्यारोपित किडनीचा लाभ झालेला दिसतो.
– तीसपैकी एका व्यक्तीला किडनी मिळते.
– विविध अवयवांच्या वेटिंग लिस्टमधील ९० टक्के लोक अवयव न मिळाल्याने मृत्युमुखी पडतात.
– भारताला दरवर्षी प्रत्यारोपणासाठी १,००,००० यकृतांची गरज भासते, त्यापैकी फक्त १००० रुग्णांना यकृत मिळते.
– यकृत देणाऱ्यांपैकी जिवंत डोनर्सचे प्रमाण ७० टक्के आहे, तर मृत डोनर्सचे केवळ ३० टक्के.
– दरवर्षी सुमारे ५०,००० हृदयांची आणि २०,००० फुफ्फुसांची गरज असते.
प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीने जरी अवयवदानाचा संकल्प केला तरी हे चित्र नक्की पालटेल अशी आशा आहे. समाजजागृती अधिकाधिक होण्यासाठी ही माहिती अवश्य शेअर करा.