(रत्नागिरी)
शहरातील पऱ्याच्या आळी येथील सुजित सुरेश खडपे (राहणार पऱ्याची आळी, D विंग, रत्नागिरी) या तरुणाने भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपशब्द वापरल्याबद्दल त्याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात भा.दं. सं. १९६० नुसार कलम २९५, ५०४ गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीने संशयिताविरोधात पुरवणी जबाब दिल्यानंतर पोलिसांनी एससी-एसटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
संशयित सुजित खडपे हा तरुण राहत असलेल्याअपार्टमेंट वृंदावन पॅलेसच्या जिन्यावरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करत अतिशय घाणेरड्या शब्दात मोठमोठ्या आवाजाने बोलत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओतून दिसत आहे. हा सर्व प्रकार गुरुवारी (दिनांक ४ जानेवारी २०२३ रोजी) रात्री साडेसात ते आठच्या सुमारास घडला. या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात घटना घडल्याने मुंबईतील आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले असून संबंधीत तरूणाने जातीय तेढ आणि तणाव निर्माण करण्याचे कृत्य केले आहे. आरोपीवर अनुसुचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली. भिम युवा पँथर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. ६ जानेवारी २०२३) रात्री पोलिसांबरोबर चर्चा केली. त्यानंतर फिर्यांदी प्रितम आयरे यांचा पुरवणी जबाब घेऊन दाखल केलेल्या गुन्ह्यात अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अधि. 1989 चे कलम 3 (1)(v) वाढीव कलम समाविष्ठ करण्यात आले. याबाबत पुढील कार्यवाही रत्नागिरी शहर पोलीस करीत आहे.
पोलीसांनी घटनेच्या मुळाशी जाणे गरजेचे…
सामाजिक सलोखा बिघडवणा-या घटना वारंवार घडत आहेत आणि हे समाज स्वास्थ्यासाठी चांगले लक्षणं नाही. अशा विकृतींना कायद्याची जरब बसेल आणि सामाजिक सलोखा कायम राहील याची काळजी संबंधित यंत्रणांनी घ्यायला हवी. तसेच कृत्य केलेल्या आरोपीच्या मागे कुणाचे गुप्त हात, हेतू कार्यरत आहेत, याच्या मुळाशी पोलिसांनी जाऊन शोध घेणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया आंबेडकरी कार्यकर्ते अनिल जाधव यांनी दिली आहे.