(मुंबई)
अवकाशात पूर्व क्षितिजावर नयनरम्य खगोलीय घटना घडणार आहे. पूर्व क्षितिजावर उल्का वर्षाव होणार असून हा तेजस्वी प्रकाशोत्सव पाहता येणार आहे. अवकाशप्रेमींसाठी ही पावसाळ्यातील दिवाळीच ठरणार असल्याचे मत ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी व्यक्त केले आहे. १२ आणि १३ ऑगस्ट या दोन दिवसात या उल्का जळून नष्ट होताना त्याचे अग्नी गोळे सरळ रेषांमध्ये रंगीबेरंगी रंग उजळत आकाशात आतीषबाजी करताना दिसणार आहेत.
अवकाशात येऊन गेलेले धुमकेतू, लघुग्रह आदींचे तुकडे पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षणामुळे खेचल्याने वातावरणात पेट घेतात, अशा उल्का अधून मधून आकाशातून पृथ्वीवर येताना दिसतात. उल्कांची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा निश्चित असल्यामुळे वर्षातील ठराविक वेळी ठराविक तारका समूहातून काही उल्का अधिक प्रमाणात पडताना दिसतात. १२ व १३ ऑगस्टला आकाशात ही उल्कावर्षावाची विविधरंगी रोषणाई स्विफ्ट टटल या धुमकेतूंच्या अवशेषातून बघता येणार आहे. हा विविधरंगी नयनरम्य प्रकाशोत्सवाचा मध्यरात्रीनंतर पूर्व क्षितिजावर ययाती या तारका समूहातून आरंभ होईल. सर्वसाधारण दर ताशी ६० ते १०० उल्का एकावेळी तुटताना दिसतील. जसजशी रात्र संपायला लागेल तसतसा उल्का वर्षावाचा वेग वाढेल. हे नयनरम्य दृष्य काळोख्या अंधारात नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.