(मुंबई/सुरेश सप्रे)
विलेपार्ले येथील अल्पवयीन शाळकरी मुलीचे प्रियकराने अपहरण करून तिला ठार करत मृतदेह बँगेत भरून फेकुन दिला होता. मृत वंशीखा राठोड हिच्या खूनाचा शोध वालीव गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी 9 दिवसाच्या अथक प्रयत्नाने करून दोन संशयित मारेकऱ्यांना अटक करणेत यश मिळविले. दोन्ही आरोपींना वसई न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती वालीव पोलिस स्थानकातून दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1.30, वा. दरम्यान नायगाव परेरा नगर रोडवरील एका रानझुडपात काळ्या व खाकी रंगाच्या बॅगमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली होती. या माहितीवरून वालीव पोलीस ठाण्याचे संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल होते. पहाणी करता त्यांना एका मुलीचे सडलेल्या अवस्थेतील शव असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी तपास यंत्रणा कामास लावली. तपासात हे शव अल्पवयीन मुलीचे असून तीच्या पोटावर 12 ते 15 सपासप वार करून व बेदम मारहाण करीत तिला जीवे ठार मारून तो पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत काळ्या व खाकी रंगाच्या बॅगमध्ये भरून नायगाव येथील परेरा नगरात फेकून दिल्याची माहिती उघडकीस आली.
पोलिसांना मृताच्या बॅगेत शाळेचे ओळखपत्र सापडल्याने मृत मुलीची ओळख पटली व ही मृत मुलगी विलेपार्ले येथील असून ती नववीच्या वर्गात शिकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली ती घरातून शाळेत जायला निघाली तेव्हापासून ती बेपत्ता असल्याचे पोलिसांना समजले. वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 वसई, संजय पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त पंकज शिरसाट तुळिंज, यांना तात्काळ घटनेची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पोहचल्यानंतर वालीव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. वरिष्ठांच्या आदेशानुसार, गुन्हा र. नं. 858/ 2022 भांदवी, 302, 201प्रमाणे गुन्हा दाखल केला.
सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांनी सर्व प्रथम मुलीच्या पत्त्याचा शोध घेत पालक व नातलगांकडून माहिती घेतली असता सदर शाळकरी मुलीचे अपहरण झाल्याचे अंधेरी पोलीस ठाणे येथे मिसिंग दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृत मुलीचे नाव वंशीखा राठोड वय १५ ते १६ असे समजले. पोलिसांनी मुलीच्या घरी चौकशी केली असता तिचा प्रियकर संतोष मकवाना हा असल्याची खात्री पटली. सदर मुलगी त्याच्या सोबत गेल्याची माहितीही मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली असता मुलीच्या कुटुंबीयांनी संतोष मकवानावर संशय व्यक्त केला.
पोलिसांचे पथक आरोपीला पकडण्यासाठी रवाना केले. तर आरोपी विरार येथून गुजरातला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच संतोष हा घटनेपासून बेपत्ता असल्याचे व त्याची मिसिंग असल्याची नोंदही पोलिसात असल्याचे समजले यावरून सर्व घटनांचा अभ्यास करून पोलिसांनी त्या आधारे गुजरातचे पालनपुर शहर गाठले.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने दि. 3 सप्टेंबर रोजी गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष मदन मकवाना, राहणार खार व भाऊ विशाल दीपक मकवाना राहणार जूहू, या दोघांना गुजरात मधून अटक केली. त्यांना वसई न्यायालयापुढे हजर केले असता दोघांनाही 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांचे मार्गदर्शनाखाली वालिव पोलीस करीत आहेत.