रत्नागिरी शहरानजीकच्या भाट्ये परिसरात 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी गैरकृत्य करुन विनयभंग करण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाने सोमवारी तीन वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना 9 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 8 वा.सुमारास घडली होती.
तजमुल जैनुद्दीन भाटकर (33,रा.भाट्ये,रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.त्याच्याविरोधात पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार, 9 ऑगस्ट रोजी रात्री ती आपल्या लहान बहिणीला अरबी शिकवणीच्या क्लासहून घरी आणण्यासाठी जात होती.ती एका बोळातून जात असताना आरोपी तजमुलने तिच्या पाठीमागून जाउन गैरकृत्य केले व तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता.याप्रकरणी तीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मुक्ता भोसले यांनी तपास करुन तजमुलविरोधात भादंवि कलम 354 (अ) आणि पोक्सो कलम 8 व 12 नुसार गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
गेले 9 महिने हा खटला न्यायालयात सुरु होता. सरकारी पक्षातर्फे अॅड.मेघना नलावडे यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून सोनाली शिंदे यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे 6 ते 7 साक्षिदार तपासून केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधिश व्ही.ए.राउत यांनी तजमुल याला भादंवि कलम 354 (अ) नूसार 1 वर्ष शिक्षा व 5 हजार रुपये दंड तो न भरल्यास 6 महिने साधा कारावास कलम 7 व 8 नूसार 1 वर्ष शिक्षा व 10 हजार रुपये दंड तो न भरल्यास 6 महिने साधा कारावास.आणि कलम 11 व 12 नूसार 1 वर्ष शिक्षा व 1 हजार रुपये दंड तो न भरल्यास 6 महिने साधा कारावास अशी एकूण 3 वर्ष साधा कारावास आणि 16 हजार रुपये दंडाची शिक्षा सूनावली.