(खेड)
शहरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका सरकारी कर्मचाऱ्याला ६ वर्षांची शिक्षा आणि वीस हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. खेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर एम. देशपांडे यांनी हा निकाल दिला.
आसीफ अल्लाउद्दीन तडवी (रा. शिवतर रोड, संत सेनानगर, ता. खेड, जि. रत्नागिरी मूळ रा. सावखेडा सीम पोस्ट दहीगाव, ता. यावल, जि. जळगाव) असे त्याचे नाव आहे. ही घटना १९ मे २०२३ रोजी घडली होती. सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा न्यायालयासमोर मांडण्यात आला. न्यायालयाने पुरावे ग्राह्य धरून आरोपीला पोक्सोचे कलम १० नुसार ६ वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच भारतीय दंड विधान कायदा कलम ३५४ (१) वर्ष सश्रम कारावास आणि १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास, कलम ३५४ (अ) (१) (आय) नुसार १ वर्ष सश्रम कारावास, कलम ४५११ वर्ष सश्रम कारावास आणि १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास, कलम ५०६ नुसार १ वर्ष सश्रम कारावास, अशी शिक्षा ठोठावली आहे.
अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एन. बी. धोंगडे आणि जिल्हा सहायक सरकारी अभियोक्ता मृणाल जाडकर यांनी कामकाज पाहिले. तपासिक अंमलदार म्हणून पोलिस निरीक्षक नितीन भोयर तसेच कोर्ट पैरवी म्हणून सूरज माने यांनी काम पाहिले.