(रत्नागिरी)
साहित्यातून समाजात परिवर्तन होते. भारतासह परदेशांतही संस्कृत भाषा बोलली जाते. त्यामुळे संस्कृत भाषा मृत नाही. एकेकाळी हिब्रु ही मृतभाषा होती. परंतु त्यावर तज्ञांनी काम केले व ही भाषा पुनरुज्जीवित झाली. संस्कृतच्या प्रचार, प्रसारासाठी ही भाषा बोलली गेली पाहिजे व जास्तीत जास्त साहित्य लिहिले गेले पाहिजे. भारतात अलिकडे संस्कृत नियतकालिकांमधून मोठ्या प्रमाणावर संस्कृत साहित्य रचना केली जात असल्याचे प्रतिपादन रामटेकचे कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय नक्की प्रकाशित करेल, अशी ग्वाही विश्वविद्यालयाचे कुलगुरु डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत विभागाच्या वतीने ६६ व्या कालिदास स्मृति समारोहात आधुनिक संस्कृत साहित्य निर्मिती या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. राधाबाई शेट्ये सभागृहात झालेल्या कार्यक्रमास विद्यार्थी, संस्कृतप्रेमी नागरिक उपस्थित होते. प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी कुलगुरु डॉ. पेन्ना यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी प्रास्ताविकामध्ये कालिदास व्याख्यानमालेचा थोडक्यात इतिहास सांगितले. प्रा. जयंत अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. पेन्ना यांनी सांगितले की, संस्कृतमध्ये पाणिनी, भर्तुहरी, कालिदास असे एकाहून एक सरस साहित्यिक होऊन गेले. श्रीमती चरितम् हे ५ हजार ओव्यांचे महाकाव्य २५ वर्षीय श्रुती कानेटकर हिने लिहिले. तिला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. असेच लेखन युवकांनी केले पाहिजे. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश येथेही संस्कृत विद्वान लेखन करत आहेत. अलीकडचे लेखन संधी, समास वगळून बाळबोध पद्धतीने लिहिले जात आहे.