(मुंबई)
स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी असलेली आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लिमिटेड कंपनी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीची महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक आहे. मात्र स्टील निर्मिती आणि प्रक्रिया पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ही कंपनी आणखी ८० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी कोकणातील ५ हजार एकर जागा संपादित केली जाणार आहे.
याबाबत नुकतीच सह्याद्री अतिथीगृह येथे कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, एमआयडीसीचे सीईओ विपीन शर्मा, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे सीईओ अमित सैनी,आणि डेव्हलपमेंट कमिशनर दीपेंद्रसिंग कुशवाह आदीजण उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्रात स्टील उद्योगात आणखी गुंतवणूक करण्याची कंपनीने ईच्छा व्यक्त केली. यासाठी पाच हजार एकर जमीन बंदराजवळ, रस्ते, रेल्वेचे जाळे तयार असलेल्या ठिकाणी हवी असल्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली. शिवाय बीकेसी वांद्रे येथे कंपनीच्या कॉर्पोरेट मुख्यालयासाठी जागा देण्याची विनंती केली.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमा परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन प्राथमिक टप्प्यात देण्यास तत्वत: मान्यता दिली. याबाबत जागा निश्चिती, उर्वरित जमीन आणि भूसंपादन प्रक्रियेसाठी मेरिटाईम बोर्ड, एमआयडीसी आणि कंपनी प्रतिनिधींनी स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घ्यावा असे ठरविण्यात आले. कंपनीच्या गुंतवणुकीमुळे कोकणासह राज्यातील हजारो तरूणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले