(राजापूर)
गौरी गणपतीचे विसर्जन वेळी पाण्यात वाहून गेलेल्या रायपाटण येथील युवक अक्षय दिलीप शेट्ये (वय २३) याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी अर्जुना नदीपात्रात सापडला. पंचनाम्यानंतर मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यावर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गौरी गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी रायपाटण येथे ही दुर्घटना घडली होती. सायंकाळी अर्जुना नदी पात्रातील जुन्या फुटब्रीजजवळ गणपती विसर्जनासाठी रायपाटण वरची बाजारवाडीतील मंडळी गेली होती. विसर्जनानंतर नदीपात्रात उतरलेल्या अक्षयला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो पाण्यासमवेत वाहून गेला होता. त्यानंतर जोरदार शोध सुरू होता, मात्र त्याचा पत्ता लागला नव्हता. रात्री उशिरापर्यंत रायपाटणमधील ग्रामस्थ अर्जुना नदीपात्रात त्याचा शोध घेत होते. सुमारे तीन-चार कि. मी. पर्यंत नदीपात्रात ग्रामस्थ शोध घेत होते दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा शोधाशोध सुरु झाली होती. जेथे घटना घडली त्या स्थानापासून बागवेवाडीपर्यंत नदीच्या दुतर्फा शोध सुरु होता.
मात्र, जेथून अक्षय पाण्यासमवेत वाहत गेला त्या ठिकाणापासून काही अंतरावर अक्षयचा मृतदेह अखेर सापडला. त्या नंतर मृतदेहाचा रितसर पंचनामा झाल्यानंतर तो त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर मृतदेहावर रायपाटणमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. तरुण वयात अक्षयचा मृत्यू ओढवल्याने रायपाटणमधून दुःख व्यक्त करण्यात येत होते.