(रत्नागिरी)
अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीचे अजून दोन विद्यार्थी पोलिस भरतीत निवडून आले आहेत. रत्नागिरी जिल्हा पोलिस भरतीमध्ये यावर्षीच अकादमीचे ३ विद्यार्थी निवडून आले होते. आता आणखी दोन विद्यार्थ्यांनी बाजी मारत आपली पोलिस भरतीमधील जागा निश्चित केली आहे. अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीचा विद्यार्थी साईराज रघुनाथ पाथरे याची सोलापूर जिल्हा SRPF दलामध्ये तर मानसी मनोज लाड हिची मुंबई पोलिस भरतीत निवड झाली आहे.
साईराज पाथरे यांनी रत्नागिरी पोलिस भरतीची परीक्षा दिली होती पण त्यांची निव्वळ १ मार्काने निवड हुकली होती. परंतु अभ्यासातील सचोटी व सातत्य राखत अजिबात हार न मानता अभ्यासाबरोबरच प्रचंड इच्छाशक्ती व आत्मविश्वासाच्या जोरावर सोलापूर जिल्हा SRPF दलामध्ये निवडून येत त्यांनी हे यश संपादन केले आहे. अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीने पोलिस भरतीसाठी स्वतंत्र बॅच घेतली होती. त्या बॅचमध्ये भरती संदर्भात सर्व विषयांचे मार्गदर्शन केले होते. त्या मार्गदर्शनाचा फायदा घेत या विद्यार्थ्यांनी यावर्षी देदीप्यमान यश मिळवले आहे.
दरवर्षी अकादमी नेट- सेट मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करत असते. प्रत्येक वर्षी अकादमीचे विद्यार्थी नेट व सेट परीक्षेत उत्तीर्ण होत आहेत. यावर्षी जून २०२३ मध्ये युजीसीकडून घेण्यात आलेल्या नेट परीक्षेमध्ये अकादमीचे तेजस कळंबटे यांनी इतिहास विषयातून नेट परीक्षा देत नैपुण्य मिळवले आहे. अकादमीतर्फे या सर्व विद्यार्थ्याने अभिनंदन करण्यात आले आहे.