(अयोध्या)
येत्या २२ जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानिमित्त अयोध्यानगरीत संपूर्ण राममय वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर अयोध्येप्रमाणे देशभरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. अशातच अयोध्येतील राम मंदिरात विराजमान होत असलेल्या रामलल्लाच्या मूर्तीचं मुखदर्शन झालं आहे.
सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात ही रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली आहे. दरम्यान, कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तीकार अरूण योगीराज यांनी ही सुबक मू्ती साकारली आहे. कृष्णशिळेतून घडवलेली ही रामाची मूर्ती अरुण योगीराज यांनी तयार केली आहे. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती विराजमान झाली असून, प्राण प्रतिष्ठेच्या चौथ्या दिवसाचे विधी आणि पूजाअर्चा सुरु झाली आहे. गर्भगृहात विराजमान झालेल्या रामलल्लाचा पहिला फोटो समोर आला आहे.
रामनामाचा जयघोष सुरु असतानाच तिथं मूर्ती विराजमान झाल्याचं पाहिल्यानंतर या मूर्तीचं दर्शन घेण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आणि अखेर रामलल्लांच्या मूर्तीला “याचिदेही याचिडोळा” पाहण्याचे स्वप्न साकार झाले.
आज शुक्रवार, 19 जानेवारी 2024 रोजी मंदिरामध्ये यज्ज्ञ सुरु झाल्यानंतर पुढील पूजाविधींना प्रारंभ झाला आणि क्षणातच प्रभू श्रीराम यांच्या पाषाणी मूर्तीवर सर्वांच्या नजरा खिळल्या. चरणांशी असणारं कमळपुष्प, बाजुनं सुबक नक्षीकाम आणि शुभसूचक चिन्हं असणारी प्रभावळ, कमळावर असणारे देवाचे चरण, पायांमध्ये तोडे, कंबरपट्टा अशी त्यांची आभूषणं आणि त्याला लागून असणारा पंचा, त्यावर पडलेल्या घड्या असे अनेक बारकावे या मूर्तीमध्ये टीपण्यात आले.
रामलल्लांची कर्णफुलं, त्यांची बालरुपातील केशरचना आणि चेहऱ्यावरचं स्मित या मूर्तीला आणखी उठावदार करत आहेत. मूर्तीचं नयनसौंदर्य अद्यापही समोर येऊ शकलेलं नाही. अद्यापही मूर्तीच्या डोळ्यांवर कापड असल्यामुळं आता हे अद्वितीय सौंदर्य नेमकं कधी पाहायला मिळणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.
11 दिवसांच्या विशेष पूजा आणि धार्मिक विधींनंतर राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये विराजमान करण्यात आलेल्या या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा पार पडेल. म्हैसूर येथील प्रख्यात मूर्तीकार अरुण योगीराज यांनी रामलल्लांची ही मूर्ती घडवली आहे. 51 इंचांची ही मूर्ती त्यांनी काळ्या शाळिग्राम शिळेपासून तयार केली आहे.