(अयोध्या)
अयोध्येत बहुप्रतिक्षित श्रीराम मंदिराचे बांधकाम अतिशय वेगाने सुरू असू,न संपूर्ण परिसराच्या सुशोभिकरणाचे काम जोरावर आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार राममंदिर परिसरात तब्बल 100 कोटी रुपये खर्चून देखणा मेगा मल्टीमीडिया ‘फवारा शो’ साकारणार आहे. जवळपास 25 हजार लोक एकाच वेळी एम्फीथिएटर पद्धतीने साकारलेल्या बैठक व्यवस्थेत या मेगा फाऊंटेनचा आनंद घेऊ शकणार आहेत. विशेष म्हणजे, हा फवारा कमळाच्या आकाराचा राहणार आहे.
गुप्तार घाट ते नया घाट या 20 एकर परिसरात कमळाच्या आकाराचा हा फवारा साकारण्याची कल्पना आहे. हा फवारा 50 मीटर उंचीपर्यंत पाणी फेकेल. परिसरातील दिव्य आणि आध्यात्मिक अनुभूतीसाठी हा फवारा प्रेरक ठरणार आहे. यामुळे राममंदिराची भव्यता आणखीच वाढणार आहे. या फवार्याच्या माध्यमातून निसर्गातील जलतत्त्वाचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. सोबतच फाऊंटेन शोद्वारे श्रीरामांचे महाकाव्य कथन केले जाणार आहे. हा पर्यटक आणि यात्रेकरूंसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. येथे येणार्याला जलतत्वाने शांत करणे, प्रार्थना करणे आणि सर्वांच्या सोबत बसून रामकथेचा आनंद घेण्याची संधी असा तिहेरी लाभ होणार आहे.
मल्टीमीडिया शो फाऊंटेनला शांती आणि आत्मनिरीक्षणासाठी अभयारण्य, श्रीराम मंदिरात शांत परिसरात आपली एक जागा मिळाली आहे. याचा उद्देश केवळ राममंदिर परिसराची शोभा वाढविणे एवढाच नाही तर, त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. मंदिरातील लोकाचार वाढविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हा फवारा करणार असून, त्याद्वारे शांतीची अनुभूती हा सर्वांत मोठा उद्देश यामागे राहणार आहे. भाविकांना मोठी आध्यात्मिक अनुभूतीची संधी याद्वारे मिळणार आहे.
फवार्याची रचना कमळाच्या सुरेख स्वरूपात राहणार आहे. कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. सोबतच ते भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. नैसर्गिक जलतत्त्वातच जन्माला येणार्या कमळाचाच आकार या फवार्याला राहणार आहे. यात हिंदू धर्मातील सात पवित्र नद्या गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, कावेरी, नर्मदा आणि गोदावरी या प्रतिकात्मक स्वरूपात पाकळ्या म्हणून राहतील. भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणार्या श्रीरामाच्या अस्तित्वाचे प्रतीक म्हणून या सात पाकळ्यांना साकारले जाणार आहे.