(देवरुख)
मार्लेश्वर नजीकच्या बोंडये येथील श्रीराम मंदिरामध्ये अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. मुख्य कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी गावातील सर्व ग्रामस्थांनी मिळून गावातील श्रीराम मंदिरासह ग्रामदैवत मंदीर तसेच दत्त मंदिराची साफसफाई केली . यानंतर प्राण प्रतिष्ठा समारंभादिवशी झेंडूच्या फुलांच्या माळा, आकाश कंदील, रांगोळी, विद्युत रोषणाईने देवळाची सजावट करण्यात आली. त्यानंतर सर्व ग्रामस्थ 11.00 वाजता श्रीराम मंदिर सभागृहामध्ये एकत्र जमले.
यावेळी मंगेश प्रभावळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून पुढील कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. त्यांनी प्रस्तविकामध्ये रामायण संक्षिप्त रुपात कथन करून भगवान विष्णूचा अवतार श्रीरामचंद्राच्या आदर्शरूपाचे विवेचन केले. त्यानंतर भारतातील पहिला मुघल शासक बाबरने सन 1528 मध्ये राममंदिर पाडून मशीद बांधली, तसेच 500 वर्षे हिंदूंनी लढलेल्या तब्बल 76 लढाया, शेवटी 2019 मधील कोर्टाच्या आदेशानुसार रामज्मभूमी पुन्हा प्राप्त होईपर्यंतचा इतिहास थोडक्यात कथन करून उपस्थितांना आजच्या कार्यक्रमाचे प्रयोजन स्पष्ट केले.
त्यानंतर सर्व ग्रामस्थांनी राम जप केला व राम रक्षा म्हटली. महिलांनी रामगीत गायन केले. यानंतर महाआरती करण्यात आली. प्रभावळकर कुटुंबीयांच्या या श्रीराम देवस्थानतर्फे बुंदी लाडू व शिरा प्रसाद वाटप करण्यात आले. यानंतर सर्व ग्रामस्थ राम जप करीत गावचे ग्रामदैवत मंदिर आणि दत्त मंदिर येथे पोहोचले. तेथेही आरती व प्रसाद वाटप करण्यात आले व त्यानंतरच पूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली. संपुर्ण कार्यक्रमामध्ये गावातील बहुसंख्य पुरुष व महिला भक्तिभावाने सहभागी झाले होते.