( रत्नागिरी / प्रतिनिधी )
श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालय, देवरूख यांच्यावतीने घेण्यात आलेल्या स्व.शालिनी आणि स्व.सदानंद बेंदरकर स्मृती कथालेखन स्पर्धेत रत्नागिरीतील लेखक अमोल पालये यांच्या संगमेश्वरी बोलीतील ‘मटान’ या कथेला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
श्री सद्गुरू वाचनालय, देवरूख यांच्यावतीने घेण्यात आलेल्या कथालेखन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये रत्नागिरीतील लेखक अमोल पालये यांची संगमेेश्वरी बोलीतील ‘मटान’ ही कथा प्रथम आली. अन्न ही मानवाची मुलभूत गरज. पण गरीबीतील मुलांच्या अन्नाबाबतच्याही अपेक्षा कधीकधी पुर्ण होत नाही, आणि झाल्याच तर पुरूषसत्त्ताक व्यवस्थेत त्या अपेक्षांमध्ये बाईच्या जातीला दुय्यमत्वच मिळतं. वर्चस्ववादी पुरूषीवृत्तीत एक मुलगी आणि बायको कशी भरडते, याचे कथात्म दर्शन पालये यांनी ‘मटान’ या कथेतून घडविले आहे.
संगमेश्वरी बोलीतून या कथेचे लेखन केले आहे. अमोल पालये यांनी यापुर्वीही संगमेश्वरी बोलीतून कथालेखन केले असून ते लोकप्रिय ठरले आहे. नामवंत दिवाळी अंकातून त्यांच्या कथा प्रसिध्द झाल्या आहेत. लवकरच त्यांच्या संगमेश्वरी बोलीतील कथांचा ‘गावकी’ हा कथासंग्रह प्रकाशित होत आहे. याशिवाय संगमेश्वरी बोलीतून त्यांनी एकांकिका लेखनही केले आहे, त्या एकांकिकांनाही राज्यस्तरावर पारितोषिके मिळाली आहेत. संगमेश्वरी बोलीतील ‘पायरवबुवांच्या झाकन्या’ हे त्यांचे सदर विशेष लोकप्रिय ठरले. याशिवाय संगमेश्वरी बोलीतीलच ‘अक्रित झो.. मरनाच्या भायर बेफाट!’ या लोकप्रिय वेबसिरीजचेही त्यांनी लेखन केेले.
कोकणातील प्रमुख लोककला असलेल्या नमनातील दुर्मिळ आणि हरवत चाललेली म्हण्णी, पौराणिक आख्याने, बतावणी, अंगसोंगे यांचे संकलन आणि गणनाट्यांचे लेखनही ते करत आहेत. जनसेवा ग्रंथालयातर्फे प्रकाशित होणार्या ‘शब्दांकुर’ या हस्तलिखिताचे संपादनही त्यांनी केले आहे. याशिवाय रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून सादर होणार्या ‘गप्पागोष्टी’ या कौंटूबिक मालिकेचेही त्यांनी लेखन केले आहे. साहित्य, ग्रंथालय, पत्रकारिता लोककला क्षेत्रातून ‘मटान’ या कथेच्या सुयशाबद्दल अमोल पालये यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.