(मुंबई)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल तसेच लाच देण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई न्यायालयाने सोमवारी जामीन दिला. अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हे दाखल करीत मुंबई पोलिसांनी मार्चमध्ये जयसिंघानीला अटक केली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डी. अलमाले यांनी त्याला जामीन दिला.
अमृता फडणवीस यांनी 20 फेब्रुवारी रोजी जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा विरुद्ध ब्लॅकमेल, धमकावणे आणि एक रुपयाची ऑफर दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर मुंबई पोलिसांच्या रडारवर जयासिंघानी आला होता. या प्रकरणात अनिक्षाला 16 मार्च रोजी अटक करून पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आता ती जामिनावर आहे. दररोज न्यायालयात हजेरी लावण्याचा तसेच या प्रकरणातील साक्षीदारांना कोणतीही धमकी किंवा कोणतेही आमिष देऊ नये, असा निर्देश न्यायालयाने जयसिंघानीला दिला. या व्यतिरिक्त तपास अधिकार्याकडे पासपोर्ट जमा करण्याचा तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश न सोडण्याचा आदेशही न्यायालयाने त्याला दिला आहे. अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अनिक्षा आणि अनिल जयसिंघानीच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.