(नाशिक)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा ताफा टोल व्यवस्थापनाने थांबवल्याच्या रागातून मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित टोलनाक्याची तोडफोड केली आहे. अमित ठाकरे यांना अर्धा तास ताटकळत ठेवल्याने मनसे पदाधिकाऱ्यांकडून ही तोडफोड करण्यात आली आहे.
अमित ठाकरे आणि मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी 22 जुलै रोजी संध्याकाळी अहमदनगरहून सिन्नरकडे समृद्धी महामार्गाहून येत होते. यावेळी सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर अमित ठाकरेंचा ताफा अडवण्यात आला. त्यांना आर्धा तास थांबवलं गेलं. ओळख सांगूनही संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
अमित ठाकरेंचा ताफा अडवल्याने संतप्त कार्यकर्त्यांकडून टोलनाक्याची तोडफोड pic.twitter.com/7GnWObSPO8
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 23, 2023
मध्यरात्री नाशिक शहराचे शहराध्यक्ष दिलीप दातीर तसंच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली आहे. ही संपूर्ण तोडफोडीची घटना टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अमित ठाकरे म्हणाले की, शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन आम्ही नाशिकच्या दिशेने निघालो. समृद्धी महामार्गावरून जात असताना सिन्नर येथील टोलनाक्यावर कार थांबवण्यात आली. कारला फास्टटॅग असतानाही टोलनाक्यावरील फाटक उचलण्यात आले नाही. याबाबत कार्यकर्त्यांनी मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना कारण विचारले. त्यावर तांत्रिक कारण असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. परंतु, मॅनेजरसह कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. काही वेळानंतर कार सोडण्यात आली. पण, हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर टोलनाक्याची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली. राज ठाकरे यांच्यामुळे ६५ टोलनाके बंद झाले. माझ्यामुळे आणखी एक बंद झाला, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली.