(मुंबई)
महानायक अमिताभ बच्चन यांनी आपला जुहू येथील ‘प्रतीक्षा’ बंगला मुलगी श्वेता नंदा हिला भेट दिला आहे, असे अधिकृत कागदपत्रांमध्ये म्हटले आहे. ‘प्रतीक्षा’ या बंगल्याची किंमत 50.63 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ही अमिताभ बच्चन यांची शहरातील पहिली मालमत्ता असल्याचे सांगितले जाते आणि बच्चन कुटुंबाच्या तीन बंगल्यांपैकी हा एक आहे. मालमत्ता नोंदणीनुसार, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मुलीला भेट म्हणून 9 नोव्हेंबर रोजी बंगला हस्तांतरित केला आणि मुद्रांक शुल्क म्हणून 50.65 लाख रुपये भरले. विठ्ठलनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेतील बंगला 674 चौरस मीटर आणि 890.47 चौरस मीटरच्या दोन भूखंडांमध्ये पसरलेला आहे, ज्याची एकूण किंमत 50.63 कोटी रुपये आहे.
भेट दिलेल्या दोन भूखंडांसाठी त्यांनी प्रत्येकी 200 रुपये नोंदणी शुल्कही भरले. 890.47 चौरस मीटरचा मोठा भूखंड अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांच्या मालकीचा होता, तर लहान भूखंड अमिताभ बच्चन यांच्या मालकीचा होता. अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि सून अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा विवाह सोहळा 2007 मध्ये ‘प्रतीक्षा’ आणि ‘जलसा’ या बंगल्यात पार पडला. ‘जनक’ या परिसरातील तिसर्या बंगल्यात अमिताभ बच्चन यांचे कार्यालय आहे. असे म्हटले जाते की, अमिताभ बच्चन यांचे वडील कवी हरिवंशराय बच्चन यांनी बंगल्याला ‘प्रतीक्षा’ हे नाव दिले आहे आणि त्यांच्या एका कवितेत या बंगल्याचा उल्लेख आला आहे.