(मुंबई)
शिवसेना फुटीनंतर होणाऱ्या आजच्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने “महारणनीती” आखल्याचं दिसून येतंय. बांद्रा कुर्ला संकुलात होत असल्याने सभेला लाख-दीड लाख लोकांची गर्दी अपेक्षित आहे. ही गर्दी जमविण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी गेली १५ दिवस जिल्हा-तालुका पिंजून काढला आहे. प्रत्येक शिवसैनिकाची मुंबईत येण्यापासून राहण्या-खाण्यापर्यंतची व्यवस्था होईल, अशी तयारी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
शिंदे गटाकडून होलोग्राम टेक्नॉलॉजीचा वापर करुन बाळासाहेबांच्या प्रतिमेला अॅनिमेशनच्या रुपात मंचावर उभं करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाच्या दरम्यान 51 फुटी तलवारीचे शस्त्रपूजन करण्यात येणार आहे.
शिंदे गटाकडून बाळासाहेबांचे जुन्या 40 व्हिडीओ मंचावर दाखवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाच्या दरम्यान हे व्हिडीओ दाखवण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी कशा प्रकारे बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केली हे त्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे. त्याचसोबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना 12 फुटी चांदीची तलवार देण्यात येणार आहे. या आधी गिनीज बूकामध्ये 11 फुटी चांदीच्या तलवारीची नोंद आहे. त्यामुळे हा नवा विक्रम होऊ शकतो.
शिंदे गटाच्या या मेळाव्यासाठी दोन ते तीन लाख लोक येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या लोकांच्या खाण्या-पिण्याची सोय करण्यासाठी व्यासपीठाच्या बाजूला व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी पाच लाख वडापाव आणि इतर खाद्यपदार्थांची सोय करण्यात येणार आहे.
शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी 400 बाय 1200 फुटी मंच तयार करण्यात आला आहे. या मंचावर उद्या ठाकरे गटातील व्यक्ती दिसू शकेल. फक्त शिवसैनिक किंवा कार्यकर्तेच नव्हे तर ठाकरे परिवारातील कुटुंब शिंदे गटासोबत असल्याचं यातून संदेश देण्यात येणार आहे. उद्याच्या मेळाव्यासाठी आठ वक्त्यांची यादी तयार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेचा शिवाजी पार्कवर तर शिंदेगटाचा बीकेसी मैदानावर मेळावा होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर कुरघोडी करण्यासाठी थेट अयोध्येच्या संत महंतांनाच दसरा मेळाव्याला आमंत्रण देऊन खरे हिंदुत्ववादी आम्हीच आहोत आणि संत महंतांचा आशीर्वादही आम्हालाच आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. या निमित्ताने स्वत:ला प्रखर हिंदुत्ववादी म्हणून प्रोजेक्ट करण्याचा एकनाथ शिंदे यांचा सोपा प्रयत्न आहे. आता या महामेळाव्यात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.