(मुंबई)
राजा बढेंनी लिहिलेले, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले आणि शाहीर साबळे यांनी आपल्या पहाडी आवाजात गायलेले जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत आता राज्यगीत होणार आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
केंद्र सरकारने सर्व राज्यांना आपापले राज्यगीत ठरविण्याच्या सूचना केल्या होत्या. काही राज्यांनी आपले राज्यगीत तयारही केले आहे. राज्यगीत सूचविण्यासाठी समितीही तयार करण्यात आली होती. त्यानुसार आता “जय जय महाराष्ट्र माझा” या गीताला आता राज्यगीताचा दर्जा देण्यात येणार आहे. त्याला राज्यगीताचा प्रोटोकॉलही असणार आहे. म्हणजे सर्व शासकीय कार्यक्रमात हे गीत वाजविण्यात येईल.
याबाबत अधिकृत घोषणा झाल्यावर सर्व शासकीय कार्यक्रमांचा शुभारंभ राज्यगीताने तर समारोप राष्ट्रगीताने होणार आहे. या गीताचे हक्क ज्यांच्याकडे आहेत, त्यांची परवानगी घेण्याचे सर्व सोपस्कार पार पाडूनच हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.