(मुंबई)
मुंबईच्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्यानं आपली सव्वातीन कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचा दावा करत भाजप खासदारानं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अभिनेते आणि भाजप खासदार रवी किशन यांची सव्वातीन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळं आता एका भाजप खासदारालाच कोट्यवधींचा गंडा घातल्यानं देशभरात खळबळ उडाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, खासदार रवी किशन यांनी २०१२ साली मुंबईतील व्यापारी जितेंद्र जैन यांना ३.२५ कोटी रुपये दिले होते. त्यानंतर खासदार रवी किशन यांनी आरोपी जितेंद्रला पैसे परत मागितले तेव्हा त्यानं ३४ लाखांचे १२ चेक दिले. परंतु किशन यांनी ते चेक एसबीआयच्या गोरखपूर शाखेत ते जमा केले असता ते चेक बाऊंस झाले. त्यामुळं त्यांनी आरोपी जितेंद्रला याबाबत माहिती विचारली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. रवी किशन यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात रवी किशन यांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.