(मुंबई)
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावे काही दिवसांपूर्वी अकोल्यामध्ये कृषी विभागाच्या कथित पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकात अधिकारी नसलेल्या अनेक खासगी व्यक्तींचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. त्यामध्ये अब्दुल सत्तार यांचा स्वीय सहाय्यक दीपक गवळी याचादेखील समावेश होता. या पथकाने कारवाई टाळण्यासाठी लाच मागितल्याचा गंभीर आरोप एका खत कंपनीच्या व्यवस्थापकाने केला आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील दौऱ्यातील शासकीय पत्रात गवळीचा सत्तारांचे स्वीय सहाय्यक असा उल्लेख करण्यात आला आहे. या शासकीय पत्रामुळे कृषिमंत्र्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, मात्र अब्दुल सत्तार यांनी हा दावा फेटाळला आहे. दीपक गवळी आपला पीए नसून कृषी अधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सत्तार यांची हकालपट्टी करा : नाना पटोले
अकोल्यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावाने कृषी विभागाने धाडी टाकून व्यावसायिकांकडून पैसे मागितल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या धाड पथकात सत्तारांचा स्वीय सहाय्यक दीपक गवळीसह इतर अनेक खासगी लोकांचा समावेश होता, तर आपल्याच सांगण्यावरून या धाडी टाकण्यात आल्या आहेत, त्यात चुकीचे काहीच झाले नाही, असे कृषिमंत्री स्वतःच सांगत आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खते आणि बियाणे वेळेवर मिळाली पाहिजेत, याची व्यवस्था करण्याऐवजी कृषिमंत्री आणि त्यांचे कार्यालय धाडी घालून वसुली करण्यात गुंग आहे. त्यामुळे या वसुलीबाज कृषिमंत्र्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
कृषी विभागाविरोधात तक्रार करणाऱ्या कंपनीविरोधात कृषी विभागाने कारवाई सुरू केली आहे. या धाडीत काही चुकीचे नाही. दीपक गवळी कृषी अधिकारीच आहेत. ते माझे पीए नाहीत. माझ्या काही शासकीय दौऱ्यांमध्ये त्यांचा पीए असा उल्लेख झाला आहे. कृषी विभागातील ६२ अधिकाऱ्यांनी मे महिन्यापासून ८६ कारवाया केल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी २६९ कारवाया केल्या आहेत, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार, (कृषिमंत्री) यांनी दिली आहे.